नवी दिल्ली : केरळमध्ये पूरस्थितीत उद्भवलेल्या परिस्थितीत झालेलं भयंकर नुकसान लक्षात घेता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मदतीसाठी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. त्यानंतर पक्षातील खासदार, आमदार आणि विधान परिषद सदस्य आपलं एका महिन्याचं वेतन राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देणार आहेत. पक्षाच्या महासचिव, राज्य प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांनी पूरग्रस्तांना शक्य त्या पद्धतीनं मदत करण्याचं आवाहन केलंय.
केरळमधली सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन 'राष्ट्रीय आपत्ती' घोषित करण्याची मागणी राहुल गांधींनी केलीय.
एका सरकारी अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या पुरात ८ ऑगस्टपासून आत्तापर्यंत ३२४ लोकांचा मृत्यू झालाय. लाखो हेक्टर जमिनीवरची पिकं नष्ट झालीत. राज्यात एकूण ८ हजार करोड रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
दरम्यान, केरळमध्ये पुरामुळे एकच दाणादाण उडालीय. यादरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियानं दोन करोड रुपयांचा मदतनिधी देण्याची तयारी दर्शवली. स्टेट बँकनं आपल्या २.७ लाख कर्मचाऱ्यांनाही मुख्यमंत्री आपात्कालीन मदत कोषात योगदान देण्याचा आग्रह केलाय. सोबतच राज्यात बचाव आणि मदत कार्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आलेत.
मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत पाठवल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जर शुल्क आकारण्यात आले तर, ते माफ केले जाईल
ग्राहकांच्या खात्यात मुलभूत रक्कम ठेवण्याची अटही काढण्यात आली. त्या खातेधारकांना लागलेला दंडही माफ केला जाणार
ग्राहकांच्या क्रेडीट कार्ड्सची सेवा एक महिन्यांनी वाढवली
राज्यात जागोजागी पॉईंट ऑफ सेल (PoS) बनविण्यात आले आहेत. ज्यामुळे कमीत कमी २००० रूपये ग्राहकाला खात्यावरून काढता येऊ शकतात
ज्या ग्राहकांची व्यक्तीगत कागदपत्रे गहाळ, किंवा हरवली आहेत त्यांचे फोटो आणि स्वाक्षरी किंवा आंगठ्याची निशाणी घेऊन खाते उघडले जाईल