नवी दिल्ली : राफेल विमान सौद्याप्रकरणी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन एक मोठा गौप्यस्फोट करण्याची काँग्रेसनं तयारी केली आहे. दरम्यान आज सकाळी माजी संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी आता या वादात उडी घेतली आहे. यूपीए पेक्षा स्वतात विमानं मिळत होती, तर मग १२६ ऐवजी ३६ विमानं का घेतली असा सवाल अँटनी यांनी केला आहे.
राफेल विमान खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी केला होता. आरोपानंतर त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर याबाबत टीका केली होती. राफेल विमानांच्या खरेदीवरुन यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या. दरम्यान राहुल गांधी यांनी या प्रकरणात अनिल अंबानी यांचं देखील नाव घेतलं होतं. यावर प्रतिक्रिया देतांना अनिल अंबानी यांनी म्हटलं होतं की, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आणि दुर्दैवी आहेत. अखेर सत्याचाच विजय होईल.
राफेल खरेदी करारावरुन अर्थमंत्री अरुण जेटली आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. राफेल विमान खरेदीत विमानांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. यूपीए सरकारच्या काळात राफेल डीलमध्ये एका विमानाची किंमत 520 कोटी रुपये ठरली होती. मात्र, भाजप सरकारने नव्या करारात एका विमानाची किंमत अचानक 1600 कोटी रुपये झाली आहे. या करारामुळे अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्यात आल्याचाही गंभीर आरोप राहुल गांधींनी केला होता.