Ram Mandir : 'अन्याय असेल तिथं राम प्रकटणार नाही'

 राहुल गांधी यांची सूचक प्रतिक्रिया   

Updated: Aug 5, 2020, 04:28 PM IST
Ram Mandir : 'अन्याय असेल तिथं राम प्रकटणार नाही' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : बुधवारी ayodhya अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राम जन्मभूमीचा शिलान्यास सोहळा पार पडला. यावेळी अतिशय शुभसूचक अशा वातारवणात धार्मिक विधींनुसार पूजाअर्चाही करण्यात आली. सारा देश एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होत असतानाच सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. प्रत्येकानं या सोहळ्यानिमित्त आपल्या प्रतिक्रिया देत मतप्रदर्शन केलं. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही एक ट्विट करत पायाभरणी सोहळ्याला उद्देशून आपली प्रतिक्रिया दिली. या ट्विटमध्ये त्यांनी रामाचा उल्लेख मर्यादा पुरुषोत्तम म्हणून केला. 

अन्यायामध्ये राम प्रकटणार नाही.... 

मर्यादा पुरुषोत्तम राम, सर्वोत्तम मानवी गुणांचं स्वरुप आहे. 
आपल्या मनात खोलवर असणाऱ्या मानवतेचं मूळ आहे. 
राम प्रेम आहे, ते घृणा असेल तिथं प्रकट होणार नाहीत. 
राम करुणा आहे, क्रूरतेमध्ये प्रकट होणार नाहीत. 
राम न्याय आहे, अन्यायामध्ये प्रकटणार नाही... 

असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलं. त्यांच्या या सूचक ट्विटची चर्चाही झाली. पण, यावेळी मात्र मुद्दा राजकारणाऐवजी फक्त भक्तीभावापुरताच सीमीत ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान राहुल गांधी यांच्यापूर्वी त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी यांनीही या प्रसंगाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. राम मंदिर भूमिपूजानाचा सोहळा हा राष्ट्रीय एकात्मतेचा सोहळा होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं.