'आम्ही प्रभू श्रीरामाचे वंशज,' वरिष्ठ नेत्यांनी निमंत्रण नाकारल्यानंतर काँग्रेस नेत्याचं मोठं विधान, 'हे रामाला आणणारे...'

अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. एकीकडे यासाठी तयारी जोरात सुरु असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 12, 2024, 03:29 PM IST
'आम्ही प्रभू श्रीरामाचे वंशज,' वरिष्ठ नेत्यांनी निमंत्रण नाकारल्यानंतर काँग्रेस नेत्याचं मोठं विधान, 'हे रामाला आणणारे...' title=

उत्तर प्रदेशातील अयोध्या राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. दरम्यान यासंबंधी आयोजित कार्यक्रमावरुन सध्या राजकारण तापलं आहे. काँग्रेससमेत अनेक पक्षाच्या नेत्यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार देत निमंत्रण फेटाळलं आहे. यानंतर भाजपाने काँग्रेससह दुसऱ्या पक्षांना सनातन विरोधी म्हणत लक्ष्य केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही मंदिराचं अर्धवट बांधकाम आणि शंकराचार्यांनी केलेला विरोध यांचा दाखला देत पलटवार केला आहे. त्यातच आता काँग्रेसचे माजी आमदार इम्रान मसूद यांचं विधान समोर आलं आहे. 

इम्रान मसूद म्हणाले आहेत की, "प्रभू श्रीराम आम्हा सर्वांचं दैवत आहेत". इम्रान मसूद मेरठमध्ये आयोजित काँग्रेसच्या संवाद आणि कार्यशाला कार्यक्रमात पोहोचले होते. यावेळी त्यांनी आम्ही सर्व रामाचे वंशज असल्याचं म्हटलं. इम्रान मसूद यांनी भाजपाला लक्ष्य करत विधान केलं की, "राम तर बोलावणारा आहे, हे रामाला आणणारे कुठून आले?". आपण रामाला मानणारे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. जो सन्मान युपी काँग्रेस अध्यक्ष अजय राय, पक्षाचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडेय यांच्या मनात आहे, तोच सन्मान इम्रान मसूदच्या मनातही असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

युपी काँग्रेसच्या या वरिष्ठ नेत्याने भाजपा आणि आरएसएसचे लोक आमचा नकारात्मक प्रचार करत आहेत असा आरोप केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, रंजन चौधरी यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. पण त्यांनी ते नाकारलं असून, त्यानंतर इम्रान मसूद यांचं हे विधान समोर आलं आहे. इम्रान मसूद यांनी 'आजतक'शी संवाद साधताना सांगितलं की, रामलल्ला कोणत्याही एका पक्षाचे नाहीत. ते करोडो लोकांच्या आस्थेचं प्रतिक आहेत.