गांधी हत्येच्या विचारधारेचा विजय झालाय- दिग्विजय सिंह

 मी हरल्यानंतरही भोपाळच्या लोकांसोबतच राहीन असेही दिग्विजय म्हणाले. 

Updated: May 24, 2019, 06:23 PM IST
गांधी हत्येच्या विचारधारेचा विजय झालाय- दिग्विजय सिंह  title=

नवी दिल्ली : देशाची सर्वात हाय प्रोफाइल जागा असलेल्या भोपाळमध्ये कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह निवडणूक हरले आहेत. निवडणूक पराभूत झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी एक पत्रकार परिषद घेत पराभवावर भाष्य केले. महात्मा गांधींच्या हत्येची विचारधारा जिंकली आहे आणि देशात महात्मा गांधींची विचारधारा हरली ही सर्वात चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. विकासासाठी भोपाळच्या जनतेला जी आश्वासने मी दिली ती पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करेन. मी हरल्यानंतरही भोपाळच्या लोकांसोबतच राहीन असेही ते म्हणाले. 

निवडणुकीआधीच मतदान निकालाची भविष्यवाणी करणाऱ्या भाजपावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपाने 2014मध्ये 280 चा नारा दिला होता आणि तितक्या जागा त्यांना मिळाल्या. 2019 निवडणुकीत त्यांनी 300 पारचा नारा दिला आणि यावेळेसही तो खरा ठरला. भाजपाकडे अशी कोणती जादुची छडी आहे की ते जे म्हणातात तसंच होत ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा 3 लाख 64 हजार 822 मतांनी पराभव केला. दिग्विजय सिंह यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. संपूर्ण देशाचे लक्ष या मतदार संघावर होते. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार भाजपा उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना एकूण 8 लाख 66 हजार 482 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांना 5 लाख 1 हजार 660 मते मिळाली. या मतदार संघात 5 हजार 430 मतदारांनी नोटाला पसंती दिली.