नवी दिल्ली: भारताचा विकास आणि प्रगतीसाठी आम्ही मोदी सरकारसोबत एकदिलाने काम करायला तयार आहोत, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीत गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. यानंतर काँग्रेसने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नव्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. तसेच त्यांना आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी काँग्रेसने आपण देशाच्या प्रगती आणि विकासासाठी नव्या सरकारसोबत काम करायला तयार असल्याचेही म्हटले.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. यामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. मोदींच्या मंत्रिमंळात ५७ मंत्र्यांचा समावेश झाला असला तरी अजून खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांना बढती मिळणार त्यातही अतिमहत्त्वाच्या संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र खात्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाईल याची उत्सुकता कायम आहे.
Congratulations to PM @narendramodi and his new Cabinet Ministers. We wish them the best & look forward to working with them on the growth & development of India & all its citizens.
— Congress (@INCIndia) May 30, 2019
तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुढील एक महिना वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या देशभरात फक्त ५२ जागा जिंकून आल्या आहेत. या दारुण पराभवामुळे गेल्या काही दिवसांपासून संघटनेत अंतर्गत उलथापलथ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील वादविवाद कार्यक्रमात बोलावण्यात येऊ नये, असे जाहीर आवाहन केले होते.