नवी दिल्ली : भारतात नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा आलं नाही तर भारताचं मोठं नुकसान होईल, असं मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील हाँगकाँग स्थित प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी CLSA (Credit Lyonnais Securities Asia) चे मुख्य रणनितीकार क्रिस्टोफर वुड यांनी व्यक्त केलंय. 'ग्रीड अॅन्ड फिअर' या साप्ताहिकातील लेखात त्यांनी हे मत मांडलंय.
२०१८ या वर्षात खास कामगिरी नसूनही भारत आशियात वरचढ असल्याचे निरीक्षण वुड्स यांनी नोंदवलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढत्या किंमती पाहता भारतासमोरील आव्हानं वाढतील, असंही वुड्स यांनी म्हटलंय. भारतीय शेअर बाजाराकडूनही वुड्स यांना बऱ्याच आशा आहेत.
लोकसभा निवडणूक २०१९ ला अजूनही एक वर्ष बाकी आहे. परंतु, आत्ताच नरेंद्र मोदी भारतात पुन्हा सत्तेवर येणार की नाही? आणि त्यांचं सत्तेत नसणं भारताला कसं नुकसानकारक किंवा फायदेशीर ठरू शकतं, याचं आंतरराष्ट्रीय स्तरावर आकलन सुरू झालंय. अमेरिकन ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टॅनलीनं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आपल्या एका अहवालात २०१९ साली सार्वत्रिक निवडणुकांत पंतप्रधान मोदी संपूर्ण बहुमतानं जिंकतील, असा अंदाज वर्तवला होता.