मुंबई : रेल्वे स्टेशनच्या वाहनतळ जागेत गृहसंकुलांची संकल्पना सिडको प्रत्यक्षात आणणार आहे. यासाठी १२ हजार घरे बांधली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घरांची पुढची सोडत दिवाळीत काढणार असल्याचे सिडको सूत्रांनी सांगितले. त्यामुळे स्वत:चं घर घेणाऱ्या लोकांसाठी ही चांगली बातमी आहे. अगदी स्टेशनच्या बाजूला ही घर असल्यामुळे या घरांना मागणी देखील असणार आहे.
भाजप सरकारच्या काळात 'सर्वांसाठी घर' या योजनेची सर्वाधिक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले, ज्यामुळे सर्वांना आणि सर्वसामान्यांसाठी ही घरं उपलब्ध करुन दिली जात आहेत.
सिडको क्षेत्रातील अनेक भूखंडावर दोन लाख घरे बांधण्याचा संकल्प आणली गेली आणि त्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या काही सिडको जमिनीचादेखील शोध घेण्यात आला. याच काळात भाजप राज्य सरकारच्या शेवटच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन आधारित घरांची संकल्पना नेरुळ उरण रेल्वे मार्गाचा शुभारंभ करताना मांडली.
सिडकोने तात्काळ या आदेशाची अंमलबजावणी करताना रेल्वे स्टेशनबाहेर असलेल्या वाहनतळाच्या मोकळ्या जागेचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना लक्षात आले की, नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनच्या मालमत्ता तसेच बाहेरील मोकळ्या जागेची मालकी आजही सिडकोच्या ताब्यात आहे. केवळ रेल्वे रुळासाठीची जागा ही सिडकोने भारतीय रेल्वेला दिलेले आहेत.
त्यामुळे आता सिडको स्टेशनबाहेरील जागेचा वापर हा खाली वाहनतळ आणि वरती घरं, अशा पद्धतीने केला जाणार आहे. त्यासाठी काही ट्रक टर्मिनल्स देखील वापरले जाणार आहेत.
ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, सानपाडा, बेलापूर, नेरुळ आणि दक्षिण नवी मुंबईतील खारघर, खांदेश्वर, पनवेल या स्टेशनबाहेरील या परिवहन आधारित घरांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या ठिकाणी सुमारे २३ हजार घरे बांधली जाण्याची शक्यता असून या घरांची सोडत दिवाळीत काढली जाणार आहेत. या काळात सिडकोने काढलेल्या पाच सोडतीतील २४ हजार घरांची विक्री प्रक्रिया केली जात असून तळोजा नोडमधील घरांच्या विक्रीत सिडकोला अडचणी येत आहेत.