तुम्हाला 'जिन्ना वाली आझादी' हवी की 'भारत माता की जय'; जावडेकरांचा सवाल

दिल्लीच्या शाहीन बाग येथील आंदोलन सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Updated: Jan 25, 2020, 07:48 AM IST
तुम्हाला 'जिन्ना वाली आझादी' हवी की 'भारत माता की जय'; जावडेकरांचा सवाल title=

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA)विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर (आप) केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी टीकास्त्र सोडले. दिल्लीच्या शाहीन बाग येथील CAA विरोधी आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी म्हटले की, तुम्हाला  'जिन्ना वाली आझादी' हवी की 'भारत माता की जय' यापैकी एकाची निवड करायची आहे. 

शाहीन बाग येथे गेल्या काही दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. त्यामुळे देशभरात हे आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी या आंदोलनात 'जिन्ना वाली आझादी' अशी आक्षेपार्ह घोषणा देण्यात आली होती. हाच धागा पकडत प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस आणि आपला लक्ष्य केले. 

दिल्लीत भाजपला मोठा धक्का; २१ वर्ष जुन्या मित्रपक्षाने साथ सोडली

'आप' आणि काँग्रेसकडून या आंदोलनाला चिथावणी देण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी जावडेकर यांनी केला. दिल्लीतील जनतेने काँग्रेस आणि 'आप'ला याचा जाब विचारायला हवा. या आंदोलनासाठी काँग्रेस आणि 'आप'ची अभद्र युती झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. ते अल्पसंख्याक आणि तरुणांच्या मनात विषाची बीजे पेरत आहेत, अशी टीका जावडेकर यांनी केली. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ८ फेब्रुवारीला मतदान होत आहे. तर ११ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. यानिमित्ताने सध्या दिल्लीत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र, प्रचारात विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा एकमेकांवर चिखलफेक करण्यातच राजकीय पक्ष धन्यता मानत असल्याचे चित्र आहे.