भारताचा चिनी सैनिकांना दणका, सीमेवर घुसखोरी रोखली

भारत आणि चीन यांच्या डोकलाम मुद्द्यावरुन वाद होत असतानाच सीमेवर चिनी सैनिकांच्याही कुरघोड्या वाढल्या आहेत. चीनी सैनिकांचा भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे.

Updated: Aug 16, 2017, 08:22 AM IST
भारताचा चिनी सैनिकांना दणका, सीमेवर घुसखोरी रोखली title=

लेह : भारत आणि चीन यांच्या डोकलाम मुद्द्यावरुन वाद होत असतानाच सीमेवर चिनी सैनिकांच्याही कुरघोड्या वाढल्या आहेत. चीनी सैनिकांचा भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे.

भारतीय जवानांच्या या धडक कारवाईनंतर बिथरलेल्या चिनी सैनिकांनी दगडफेक केली. या दगडफेकीला जवानांनी चोख उत्तर दिले. यात काही जवान जखमी झाले आहेत. लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरून भारतीय क्षेत्रात चिनी सैनिक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, वेळीच चिनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी मंगळवारी हाणून पाडला. 

काल (मंगळवारी) चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) सैनिकांनी सकाळी सहा आणि नंतर नऊ वाजता भारतीय सीमाभागातील ‘फिंगर फोर’ आणि ‘फिंगर फाइव्ह’ भागात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जवानांनी तत्काळ त्यांना हुसकवून लावले. ‘फिंगर फोर’ भाग दोन्ही देशांमधील महत्वाचा मुख्य मुद्दा असून, या भाग आपला असल्याचे चीनचे म्हणणे आहे. १९९०च्या अखेरीस चर्चेदरम्यान भारताने या भागावर दावा केला होता.

भारतीय जवानांनी मानवी साखळी बनवून त्यांना प्रतिकार केला. त्यामुळे गोंधळलेल्या चिनी सैनिकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनीसुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिले. डोकलाम आणि सिक्कीमध्ये तणावाचे वातावरण असताना आता लडाखमध्येही तीच स्थिती उद्भवली आहे. दिल्लीतील लष्कराच्या प्रवक्त्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.