नवी दिल्ली : पाकिस्तानकडून दररोज गोळीबाराच्या घटना सुरुच आहेत. त्याच दरम्यान एक मोठी दुर्घटना टळली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका स्फोटात एक १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शाहपूर येथील १२ वर्षीय मोहम्मद इकबाल याला सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास शेतात एक बॉलसदृश्य वस्तू आढळली. मोहम्मद त्याला बॉल समजून खेळू लागला आणि त्यानंतर अचानक स्फोट झाला.
या घटनेत मोहम्मद गंभीर जखमी झाला असून त्याच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे.
पाकिस्तानकडून मोर्टार हल्ले केले जात आहेत. याचाच एक गोळा रहिवासी परिसरात येऊन पडला आणि तो फुटला नाही. मोहम्मदला हाच गोळा मिळाला असावा आणि तो बॉल समजून त्याच्यासोबत खेळू लागला. मात्र, काही वेळाने त्याचा स्फोट झाला.
या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी मोहम्मदला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. तसेच पोलिसांनाही या घटनेबाबत कळवलं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्टारचा गोळा शेतात पडलेला होता आणि तोच गोळा मोहम्मदने उचलला होता.
या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच नागरिकांनी आपल्या मुलांना घरातून बाहेर पडण्यास मनाई केली आहे.