Maharashtra Politics : शिंदे गट आणि ठाकरे गटातील (Shinde Group vs Thackeray Group) आरोप-प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाही. आता दोन्ही गटात पुन्हा एकदा खोक्यांवरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. बुलडाण्यातील चिखली इथल्या जाहीर सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारचा खोके सरकार असा उल्लेख केला होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात फ्रीजएवढे मोठे खोके नेमके कुठे जात होते हे सगळ्यांना माहिती आहे. आता ते लवकरच शोधून काढतो असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय.
फ्रीजएवढे खोके कुणाकडे गेले?
शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी आज गुवाहाटीमध्ये (Guwahati) कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही जे काही करतो ते खुलेआम करतो, लपूनछपून करत नाही, फ्रीजएवढे कंटेनर भरून खोके कुणाकडे गेले होते, ते कोण पचवू शकतो हे सर्वांना माहित आहे, एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर ते आम्ही आणू असा इशाराच मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे हे नैराश्यातून शिंद गटावर आरोप करत आहेत, त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार, त्यांची मानसिकता ढळलेली आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यात नवीन सरकार बनल्यानंतर एक सकारात्म चित्र निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे गटाला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत, त्यातून ते सावरले नाहीत अशी बोचरी टीकाही शिंदे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात आसाम भवन, आसाममध्ये महाराष्ट्र भवन
आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांनी महाराष्ट्रात आसाम भवन बांधायला शिंदे सरकारने होकार दिला, तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आसाम सरकार जागा देण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांचा गणपतीची मूर्ती देऊन सन्मान केला तसंच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या काळात मदत केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. महाराष्ट्राचा पाहुणचार स्विकारण्याचं आमंत्रणही मुख्यमंत्री शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना दिलं.