Chief Justice DY Chandrachud Munna Bhai MBBS Movie: देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे त्यांच्या न्यायनिवाड्यासाठी ओळखले जातात. जस्टीस डी. व्हाय. चंद्रचूड हे त्यांच्या टीप्पण्या आणि वेगवेगळ्या गोष्टींकडे पाहण्याच्या दृष्टीकोनासाठीही चर्चेत असतात. शनिवारी एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या चंद्रचूड यांनी डॉक्टर्स आणि रुग्णांच्या नात्यासंदर्भात केलेलं भाष्य त्यांचं वेगळेपण पुन्हा अधोरेखित करुन गेलं. तरुण डॉक्टरांनी रुग्णांप्रती सहानुभूती आणि करुणा दाखवणं गरजेचं असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले. हे सांगताना सरन्यायाधीशांनी 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केला. आरोग्य सेवांचं अंतिम ध्येय हे मानवतेला आधार देत ती सावण्याचं असल्याचंही सरन्यायाधीश म्हणाले.
डॉक्टरांसमोर बोलताना सरन्यायाधीशांनी भारत हा संशोधनामध्ये अग्रेसर असलेला देश असला तरी याचा फायदा फार मर्यादीत लोकांना होतो असं मत नोंदवलं. हाच संदर्भ देत आरोग्यविषय संशोधन सर्वांना उपयोगी पडेल यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत असं सरन्यायाधीश म्हणाले. ते पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (पीजीआयएमईआर) या संस्थेमधील 37 व्या पदवीदान समारंभामध्ये तरुण डॉक्टरांसमोर बोलत होते. मागील 62 वर्षांमध्ये भारताने आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रगतीमध्ये पीजीआयएमईआने मोलाचं योगदान दिल्याचंही सरन्यायाधीश म्हणाले.
"आज तुम्ही पदवी घेऊन बाहेर पडत आहात तर तुम्ही अशा संस्थेच्या खांद्यावर उभे आहात जी भारताच्या आरोग्यविषय प्रगतीमध्ये कायम अग्रस्थानी राहिली आहे." अशी आठवण चंद्रचूड यांनी डॉक्टरांना करुन दिली. पुढे बोलताना चंद्रचूड यांनी आरोग्य आणि कायदा या दोन्ही क्षेत्रांमध्ये व्यक्तींचं आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांचं जीवनमान सुधारावं हाच मुख्य उद्देश असतो, असं म्हटलं.
नक्की वाचा >> 'कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमिर खानही..'; CJI चंद्रचूड यांचं विधान
पुढे बोलताना चंद्रचूड यांनी अभिनेता संजय दत्तच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटाचासंदर्भ देत डॉक्टरांमध्ये सहानुभूती आणि करुणा दाखवण्याचा गुण का महत्त्वाचा आहे याबद्दल भाष्य केलं. सतत रुग्णांवर औषधांचा मारा करण्याऐवजी चित्रपटामधील 'मुन्नाभाई' तरुण रुग्णाला मिठी मारतो आणि त्याला तो 'जादू की झप्पी' असं म्हणतो. रुग्णालयातील लांबलचक कार्यपद्धतीने तणावत असलेल्या रुग्णाला दिलासा देण्याचा तो प्रयत्न करतो. या अशा प्रेमळ मिठीमुळे रुग्णांबद्दल वाटणारा आपलेपणा आणि विश्वास निर्माण करण्यात मदत होते. रुग्णालयातील रुक्ष वातावरणाच्या हे अगदी विरुद्ध असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले. चित्रपटामध्ये संजय दत्तने साकारलेल्या या भूमिकेमधील मुन्नाभाईने मिठी मारल्यावर रुग्णांचं टेन्शन पळून जातं, असंही सरन्यायाधीस म्हणाले.
नक्की वाचा >> 'चंद्रचूडसाहेब गुदरमल्यासारखे वाटतात, त्यांचे गुदमरणे देशाला महागात पडेल! कोणाचे...'
"या दृष्यामधून महत्त्वाच्या दोन गोष्ट दिसून आल्या त्या म्हणजे करुणेची शक्ती आणि वैयक्तिक आपलेपणा जपणे. आरोग्य आणि कायदा या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं अंतिम ध्येय हे मानवतेची सेवा आणि तिची मूल्य टीकवणे हेच आहे," असं सरन्याधीश म्हणाले.