सीआरपीएफच्या ताफ्यावर नक्षल्यांचा हल्ला, एक जवान शहीद

 या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे एक जवान शहीद झाले आहेत 

Updated: Mar 18, 2019, 07:55 PM IST
सीआरपीएफच्या ताफ्यावर नक्षल्यांचा हल्ला, एक जवान शहीद  title=

नवी दिल्ली : छत्तीसगडच्या अरनपूर भागात नक्षल्यांनी पुन्हा एका सीआरपीएफच्या जवानांवर निशाणा साधत हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे एक जवान शहीद झाले आहेत तर 5 जवान गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी हेलीकॉप्टरने रायपूरने येथे नेण्यात आले आहे. हा हल्ला करणाऱ्या नक्षल्यांचा शोध घेण्यास सुरूवात झाली आहे. सीआरपीएफची एक टीम हे सर्च ऑपरेशन करत आहे. 

नक्षली हल्ल्यामध्ये जखमी झालेले सर्व जवान हे सीआरपीएफच्या 31 व्या बटालियनमध्ये तैनात आहेत. हे सर्व जवान अरनपूर (दंतेवाडा) च्या कमलपोस्ट भागातून जाणाऱ्या रस्त्यावरील सुरक्षेसाठी तैनात होते. सोमवारी संध्याकाळी 4.25 च्या सुमारास सीआरपीएफची ही टीम या रस्त्यावर पाळत ठेवत होती. यावेळी मोठा स्फोट झाला आणि यामध्ये सीआरपीएफचे 6 जवान गंभीर जखमी झाले. 

या स्फोटाच्या आधीपासूनच जवानांवर लक्ष ठेवून असलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तेव्हा घटनास्थळी असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी देखील नक्षल्यांवर गोळीबार करत उत्तर दिले. बराच वेळ हा गोळीबार सुरू होता. जवानांसमोर आपण कमजोर पडत असल्याचे लक्षात येतात नक्षल्यांनी तिथून पळ काढला. 

सूचना मिळताच सीआरपीएफची दुसरी टीम घटनास्थळी रवाना झाली. नक्षली हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना कॅंपच्या हॉस्पीटलमध्ये पोहोचवण्यात आले. कॅंम्प हॉस्पीटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना चांगल्या उपचारासाठी रायपूर रवाना करण्यात आल्याचे सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी हेड कॉंस्टेबल रॅंक वनचे जवान शहीद झाल्याचेही त्यांनी सांगितले.