नवी दिल्ली : सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पहायला मिळतात आणि याच स्मार्टफोनच्या मदतीने प्रत्येकजण जागा मिळेल तिथं सेल्फी काढताना पहायला मिळतो. सेल्फीच्या याच वेडामुळे आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत. मात्र, तरीही सेल्फी प्रेम कमी होताना दिसत नाही. आता आणखीन एक घटना समोर आली आहे ज्यात सेल्फीच्या नादात एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
मध्यप्रदेशातील दमोह परिसरात असलेल्या व्यारमा नदीवर बंटी अहिरवार हा तरुण आपल्या मित्रांसोबत पिकनिकसाठी गेला होता. यावेळी सेल्फी घेताना नदीत बुडून बंटी अहिरवार याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नदीत बुडल्यानंतर बंटी अहिरवारला बाहेर काढण्यात आलं मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं.
पिकनिकसाठी नदीवर गेलेल्या तीन मित्रांनी सेल्फी काढण्याचं ठरवलं. त्यावेळी सेल्फी क्लिक करताना बंटी अहिरवार याचा पाय घसरला आणि तो नदीच्या खोलगट भागात कोसळला. यावेळी त्याचे मित्र पियुष आणि मोहन यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना अपयश आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, कछियाना परिसरात राहणारा बंटी अहिरवार हा रविवारी आपले मित्र मोहन आणि पियुष यांच्यासोबत व्यारमा नदीवर पिकनिकसाठी गेला. या ठिकाणी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सेल्फी घेताना बंटीचा पाय घसरला आणि तो नदीच्या खोलगट भागात कोसळला. आपल्या मित्राला वाचवण्याचा मोहन आणि पियुष यांनी प्रयत्न केला मात्र, त्यांना अपयश आल्याने बचाव पथकाला बोलावण्यात आलं.
बंटी अहिरवार याच्या मृत्युच्या बातमीने संपूर्ण परिवारालाच एक धक्का बसला आहे. त्याची आई प्रभाबाई यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.