ISRO Surya Mission 2023 Launching: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतूक होत आहे. चांद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सुर्य आणि शुक्राच्या दिशने आगेकूच करायचे ठरवले आहे.
चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग होताच बुधवारी संध्याकाळी उशिरा याबद्दल घोषणा करण्यात आली. चंद्रानंतर इस्रो आता आपले 'आदित्य-एल1' सूर्यावर संशोधन करण्यासाठी सूर्याकडे पाठवणार आहे. ही सूर्य मोहीम पाठवण्याची योग्य वेळही त्यांनी जाहीर केली. यासोबतच शुक्र मोहिमदेखील लवकरच सुरु केली जाणार आहे.
सूर्य मोहिमेसाठी 'आदित्य-एल1' उपग्रह (इस्रो सूर्य मिशन 2023) सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रक्षेपित केला जाईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. हे मिशन साधारण 120 दिवसांचे म्हणजेच 4 महिन्यांचे असेल. या कालावधीत उपग्रह 15 लाख किमी अंतर कापून सूर्याच्या कक्षेत पोहोचणार आहे. तेथील सौर वातावरणाचा अभ्यास करत माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
'या' ठिकाणाहून प्रक्षेपण
'आदित्य-एल1' (ISRO Surya Mission 2023) चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केले जाणार आहे. सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ आधारित भारतीय वेधशाळा तेथे तयार केली जात आहे. सूर्य मोहिमेवर जाणारे अंतराळ यान सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या पहिल्या लॅग्रेंज पॉइंट L1 भोवती प्रभामंडल कक्षेत ठेवले जाणार असल्याची माहिती इस्रोने शेअर केली आहे. L1 बिंदूच्या सभोवतालच्या उपग्रहाला कोणतेही ग्रहण न होता सूर्य सतत पाहण्याचा मोठा फायदा आहे.
'आदित्य-एल1' या उपग्रहाला सूर्यदेवाचे नाव देण्यात आले आहे. भारतीय रॉकेट पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) द्वारे वाहून नेले जाणार आहे. या उपग्रहाला रॉकेटसोबत जोडण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. सूर्य मोहिमेनंतर गगनयान मोहीम पुढे जाईल. ही मोहीम भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेचा एक भाग असून याने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
गगनयानवर काम सुरु
गगनयान मोहीम यावर्षी सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रक्षेपित केली जाणार असल्याची माहिती, इस्रो प्रमुख सोमनाथ (ISRO Chief S. somnath) यांनी दिली. भारतीय अंतराळ एजन्सी यावर्षी त्यांच्या GSLV रॉकेटसह INSAT 3DS उपग्रहाची परिक्रमा करण्याची योजना आखत आहे. त्यानंतर, अन्वेषा उपग्रह आणि XPoSAT- एक एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह प्रदक्षिणा घालतील असे यावेळी सांगण्यात आले. तसेच खगोलीय एक्स रे स्त्रोतांच्या गतिशीलतेचा अभ्यास केला जाणार आहे. भारतासाठी हे एक माइल्डस्टोन मिशन ठरणार आहे.
PSLV रॉकेटवर रडार इमेजिंग उपग्रह - RISAT-1B - चे प्रक्षेपण 2023 दरम्यान होणार आहे. भारतीय अंतराळ संस्था दोन आयडीआरएसएस उपग्रहांची परिक्रमा करण्याचीही योजना आखत असल्याचे वृत्त समोर आले आहे. या रॉकेटिंग मिशन्स (ISRO New Gagan Mission) व्यतिरिक्त, SRO पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी त्याच्या LVM3 रॉकेटवर जाणार्या विविध प्रणालींची चाचणी करणार आहे. इस्रोने 2024 मध्ये व्हीनससाठी 'व्हीनस मिशन'चे उड्डाणही निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करुन झाल्यानंतर भारतीयांना आता पुढील सेलिब्रेशनसाठी देखील तयार राहावे लागणार आहे.