Chandrayaan-3: भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करुन मोहीम पूर्णपणे यशस्वी केली. यानंतर जगभरातून याचे कौतुक होत आहे. सगळीकडून इस्त्रोच्या टिमचे अभिनंदन केले जात आहे. दरम्यान चांद्रयान 3 तर यशस्वी लॅंड झाले. प्रज्ञान रोव्हरही सुरक्षित उतरले पण आता पुढे काय? प्रज्ञान रोव्हर आता काय करतोय? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? इस्रोने ट्विट करून या मोहिमेची अपडेट माहिती शेअर केली आहे.
सध्या मिशनशी संबंधित सर्व पेलोड चांगले काम करत आहेत. विक्रम लँडरमधून बाहेर आल्यानंतर प्रज्ञान रोव्हरही चंद्राभोवती फिरत आहे. रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत असून भारतीय शास्त्रज्ञांनाही तिथून महत्त्वाची माहिती मिळत आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे कारण भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी दाखल झाले आणि टीमचीही भेट घेतली.
'चांद्रयान-3 मोहिमेच्या उद्दिष्टांपैकी एक असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग हे पूर्ण झाले आहे. चंद्रावर रोव्हर हलवण्याचे उद्दिष्टही पूर्ण झाले आहे. आता इन सिटू वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत. सर्व पेलोड सामान्यपणे कार्यरत आहेत. यापूर्वी इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये प्रज्ञान रोव्हर शिवशक्ती पॉइंटवर फिरताना दिसत आहे. त्यामुळे मिशनच्या दृष्टीने शनिवार विशेष ठरला आहे.
Chandrayaan-3 Mission:
Of the 3mission objectives,
Demonstration of a Safe and Soft Landing on the Lunar Surface is accomplished
Demonstration of Rover roving on the moon is accomplished
Conducting in-situ scientific experiments is underway. All payloads are…
— ISRO (@isro) August 26, 2023
शनिवारी पंतप्रधान इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले आणि तेथील चांद्रयान-3 टीममध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. भारताचे चांद्रयान-3 जिथे उतरले त्या ठिकाणाचे नावही त्यांनी शिवशक्ती पॉइंट असे ठेवले. मिशनच्या यशाबद्दल देशवासियांसोबतच त्यांनी शास्त्रज्ञ आणि इस्रोच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. भारताच्या अवकाशातील शक्ती बनण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.
चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगनंतर आता प्रज्ञान रोव्हरचे काम खूप महत्त्वाचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील महत्त्वाच्या गोष्टींची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी रोव्हर पाठवण्यात आले आहे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे चंद्रावर पाण्याचा शोध घेणे. याशिवाय चंद्रावर युरेनियम आणि सोन्यासारखे महत्त्वाचे आणि महागडे खनिजे असू शकतात, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. यासोबतच रोव्हर प्रज्ञानने गोळा केलेले नमुने चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे नमुने तपासण्यासाठी महत्त्वाचे ठरतील.