Chandrayaan 3 Latest Update : भारताच्या चांद्रयान 3 चा प्रवास 14 जुलै रोजी सुरु झाला आणि चंद्राच्या दिशेनं निघालेल्या या चांद्रयानानं प्रवासातील प्रत्येक टप्पा अगदी सहजपणे ओलांडला. आता तर, हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून थेट चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. चांद्रयानानं अवकाशातून आपलं काम सुरु करत चंद्राची पहिली झलकही दाखवली आहे. हे सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच इस्रोनं (isro) मात्र पुढील अडचणींबाबत सर्वांना सतर्क केलं आहे.
यापूर्वी अपयशी ठरलेल्या चांद्रयान 2 मोहिमेचा चांद्रयान 3 मोहिमेला फायदा होत असल्याचं इथं नाकारता येत नाही. किंबहुना इस्रो प्रमुखांचंही हेच मत. पण, खरं आव्हान तर पुढे असणार आहे. कारण, ज्यावेळी चांद्रयान चंद्रापासून 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वर्तुळाकार कक्षेतून पुढे जाण्यास सुरुवात करेल तेव्हा प्रवासातील खडतर टप्पा सुरु होईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितलं. परिणामी हा टप्पा व्यवस्थित ओलांडल्यानंतरच ही चिंता मिटणार आहे.
चांद्रयान 3 चंद्रापासून 100 किमीच्या कक्षेत सहजपणे पोहोचेल. पण, पृथ्वीवरून लँडरच्या स्थितीबाबत अचूक अंदाज लावण्यात अडथळे येत आहेत, अशी माहिती इस्रो प्रमुखांनी दिली. वैज्ञानिक भाषेनुसार या प्रक्रियेला कक्षा निर्धारित करण्याची प्रक्रिया म्हटलं जातं. कक्षा अचूक असल्याल पुढील टप्पे सोपे असतील असं म्हणताना आपण आकस्मिक संकटांसाठीची माहिती मिळवत पूर्वतयारी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
चंद्राच्या दिशेनं एक एक पाऊल पुढे ठेवणारं चांद्रयान सध्याच्या घडीला ताशी 170 किमी इतक्या वेगानं पुढे सरकत आहे. 5 ऑगस्टरोजी यानानं चंद्राच्या कक्षेतील प्रवेश सुरु केला. ज्यानंतर 9 आणि 17 ऑगस्ट रोजी यानाच्या कक्षा आणखी कमी करण्यात येणार असून, ते चंद्राच्या नजीक पोहोचलणार आहे. इथं यान चंद्रापासून 100 किमी अंतरावर आणलं जाईल. ज्यानंतर 23 ऑगस्ट हा दिवस या मोहिमेतील सर्वोच्च टप्पा असणार आहे. जिथं यान चंद्रावर उतरवण्यात येणार आहे.
इस्रोनं अखेरीस दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान सध्या अंडाकृती आकाराच्या कक्षेत चंद्राला परिक्रमा घालत आहे. ट्विट करतेवेळी चंद्रापासूनचं त्याचं किमान अंतर 170 किमी आणि कमाल अंतर 4310 किमी इतकं सांगण्यात आलं होतं.