Chandrayaan 3 Latest Update : असंख्य भारतीयांच्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षांसह अवकाशाच्या दिशेनं झेपावलेलं चांद्रयान 3 मजल दरमजल करत आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. खुद्द इस्रोकडूनच यासंदर्भातील माहिती देत चांद्रयान नेमकं कुठे आहे याची माहिती दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देत इस्रोनं चांद्रयान 3 चं Live Location ही सांगितलं. ज्यामध्ये त्याची पृथ्वीभोवतीची परिक्रमा पूर्ण झाली असून आता 5 ऑगस्टला चांद्रयान 3 लुनार ऑर्बिटमध्ये दाखल होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान 3 नं पृथ्वीभोवतीची परिक्रमा पूर्ण केली असून आता ते चंद्राकडे झेपावलं आहे. इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री चांद्रयानानं पृथ्वी परिक्रमा पूर्ण केली, ज्यानंतर आता अवघ्या सहा दिवसात ते चंद्राच्या कक्षेत दाखल होईल. चांद्रयानाच्या प्रवासामधील पुढचा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे.
Chandrayaan-3 Mission:
Chandrayaan-3 completes its orbits around the Earth and heads towards the Moon.A successful perigee-firing performed at ISTRAC, ISRO has injected the spacecraft into the translunar orbit.
Next stop: the Moon
As it arrives at the moon, the… pic.twitter.com/myofWitqdi
— ISRO (@isro) July 31, 2023
14 जुलै 2023 ला चांद्रयान 3 चं प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आलं होतं. त्या क्षणापासून चांद्रयानानं प्रत्येक टप्प्या यशस्वीरित्या सर केल्याचं स्पष्ट झाल्यामुळं आता पुढील टप्प्यासाठी सर्वजण आशावादी असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार ट्रांस लुनर इंजेक्शननंतर चांद्रयान 3 पृथ्वीच्या कक्षेपासून दुरावत आता चंद्राच्या नजीक नेणाऱ्या कक्षेत प्रवास करत आहे.
इथं एक बाब लक्षात घेण्याजोगी, म्हणजे नासाकडून त्यांचं यान चंद्रावर पोहोचण्यासाठी चार दिवसांपासून आठवड्याभराचा कालावधी लागतो. पण, मग इस्रो असं का करत नाही? इथं चाराचे चाळीस दिवस का लागतात? यामागे दोन कारणं असल्याचं सांगण्यात येतं. पहिलं म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घालून त्यानंतर हे यान अवकाळात पुढील मार्गावर पाठवणं कमी खर्चाचं ठरतं. इस्रोही नासाप्रमाणं यान थेट निर्धारित ठिकाणी पाठवू शकतं. पण, इथं खर्चाची गणितं महत्त्वाची भूमिका बजावतात.
इस्रोकडे (NASA) नासाप्रमाणे प्रचंड ताकदीचे रॉकेट नाहीत, ज्यांच्या माध्यमातून थेट चंद्राच्या कक्षेत पोहोचता येतं. दुसरं कारण म्हणजे यानामध्ये असणाऱ्या इंधनाचा वापर दीर्घकाळासाठी करावा लागतो. यासाठीही ते थेट दुसऱ्या ग्रहावर पोहोचू शकत नाही. असं केल्यास इंधनाचा तुटवटा जाणवून मोहिम अर्ध्यावरच सोडावी लागण्याची शक्यचा असते. परिणामी पृथ्वीभोवतीची परिक्रमा पूर्ण करून इंधनाची बचत करतच यानाचा पुढील टप्पा ओलांडला जातो.