पुढच्या काही तासांमध्ये विक्रम लँडर अंधारात जाणार; संपर्काची शक्यता मावळणार

चांद्रयान-२ मोहिमेवर पाठवण्यात आलेल्या विक्रम लँडरसोबत संपर्क करण्याचे शर्तीचे प्रयत्न इस्रोकडून करण्यात आले

Updated: Sep 19, 2019, 10:46 AM IST
पुढच्या काही तासांमध्ये विक्रम लँडर अंधारात जाणार; संपर्काची शक्यता मावळणार title=

मुंबई : चांद्रयान-२ मोहिमेवर पाठवण्यात आलेल्या विक्रम लँडरसोबत संपर्क करण्याचे शर्तीचे प्रयत्न इस्रोकडून करण्यात आले, पण तरीही विक्रम लँडरशी संपर्क होऊ शकला नाही. आता तर विक्रमशी संपर्क व्हायची शक्यता आणखी धुसर झाली आहे, कारण चंद्रावर रात्र होणार आहे. पुढच्या काही तासांमध्ये विक्रम लँडरशी संपर्क झाला नाही तर अपेक्षाभंग होईल. चंद्रावर रात्र झाल्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क करणं अशक्य होईल. चंद्रावर एक दिवस पृथ्वीच्या १४ दिवसांऐवढा असतो. याच कारणामुळे इस्रोने विक्रमचं चंद्रावरचं लँडिंग दिवसा ठेवलं होतं. लँडरमध्ये असलेला रोवर प्रज्ञान सूर्य प्रकाशामुळे मिळणाऱ्या उर्जेवरच काम करु शकतो.

चंद्रावर दिवस आणि रात्रीच्या तापमानात खूप जास्त अंतर असतं. चंद्रावर दिवसाचं तापमान जास्तीत जास्त १२७ डिग्री सेल्सियस आणि रात्रीचं तापमान शून्य डिग्री ते उणे १८३ डिग्री सेल्सियस असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. रात्रीच्या या तापमानात विक्रम लँडरचे इलेक्ट्रॉनिक भाग जीवित राहणार नाहीत. विक्रम लँडरने चंद्रावर १४ दिवस माहिती गोळा करावी अशीच रणनिती इस्रोने आखली होती. पण ७ सप्टेंबरला विक्रम लँडरचा संपर्क तुटला.

दरम्यान इस्रोने ट्विट करुन देशवासियांना धन्यवाद दिले आहेत. चांद्रयान-२चं लॉचिंग आणि कठीण काळात साथ दिल्याबद्दल इस्रोने देशवासियांचे आभार मानले. इस्रोने केलेलं हे ट्विट म्हणजे 

विक्रम लँडरशी संपर्क होत नसला तरी चांद्रयान २ चे ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत असून, पुढली सात वर्षं ऑर्बिटर चंद्राबद्दल विविध उपकरणांच्या माध्यमातून माहिती देत रहाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला, त्यामुळे भारत एका ऐतिहासिक यशाला मुकला होता.

विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग होणे अपेक्षित होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जोरात आदळले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. यानंतर चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने विक्रम लँडरचा शोध लावला होता. मात्र, विक्रम लँडर नक्की कोणत्या स्थितीत आहे, हे समजू शकले नव्हते.