अनेक उद्योजक, व्यवसायिक सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असता. कधी आपला संघर्ष मांडत तर कधी प्रेरणादायी पोस्ट शेअर करत ते हा प्रयत्न करतात. अशा अनेक पोस्ट व्हायरलही होत असतात. 'चाय सुट्टा बार' चा सह-संस्थापक अनुभव दुबे याने केलेली अशीच एक पोस्टही व्हायरल झाली आहे. पण ती व्हायरल होण्यामागे कारण वेगळंच आहे. त्याची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी त्याला शांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
'चाय सुट्टा बार' चा सह-संस्थापक अनुभव दुबे याने आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने ऑफिसमधील मीटिंगचा फोटो जोडला आहे. सोबत लिहिलं आहे की, "आम्ही फक्त 9 ते 5 काम करणारे कर्मचारी शोधत नाही आहोत. अजिबात नाही. आम्ही येथे एक आर्मी तयार करत आहोत".
अनुभव दुबेची पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. पण ही पोस्ट व्हायरल होण्यामागील कारणं वेगळी होती.
एक्सवर शेअर केल्यापासून या पोस्टला 7 लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. "कूल दिसण्यासाठी असे शब्द वापरल्याने तुम्ही कूल दिसत नाही. चहा विकणं ही काही मोठी गोष्ट नाही," असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
We are not looking for office employees working 9 to 5.
No, not at all.
We are making f**king Army here. pic.twitter.com/MGBeb9Mk0J— Anubhav Dubey (@tbhAnubhav) November 27, 2023
तर एका युजरने लिहिलं आहे की, "चहा विकण्यासाठी तुम्हाला आर्मी कशाला तयार करायची आहे?". तर एकाने म्हटलं आहे की, "आता काय बॉर्डरवर जाऊन चहा विकणार का?".
"अनुभव भाई, मला सैन्यात सामील व्हायचं आहे. तुमच्यासोबत रिंगणात लढायचं आहे," अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने तुला तात्काळ चांगल्या पीआरची गरज आहे असा सल्ला दिला आहे.
दरम्यान, 23 वर्षीय सह-संस्थापकाने त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर लिहिलं आहे त्यानुसार अल्पावधीतच त्यांचा स्टार्टअप कोट्यवधींचा व्यवसाय बनवला आहे. त्यांनी जगभरात 500 हून अधिक आउटलेट उघडले आहेत.