केंद्राकडून दिलेल्या कोरोना टेस्टिंग किटमध्ये त्रुटी; ममता बॅनर्जींचा आरोप

केंद्रावर काही आरोपही करण्यात आले.   

Updated: Apr 22, 2020, 07:48 PM IST
केंद्राकडून दिलेल्या कोरोना टेस्टिंग किटमध्ये त्रुटी; ममता बॅनर्जींचा आरोप   title=
संग्रहित छायाचित्र

कोलकाता : देशभराता CORONAVIRUS कोरोना विषाणूनं थैमान घातलेलं असतानाच आता दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं वातावरण पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्राकडून स्थापन करण्यात आलेल्या काही सदस्यीय समित्या विविध राज्यांमद्ये पाठवण्यात आल्या. या साऱ्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये मात्र काहीसं नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. जिथे केंद्रावर काही आरोपही करण्यात आले. 

केंद्र शासनाशी वादाची ठिणगी धुमसत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे. केंद्राकडून पश्चिम बंगालमध्ये त्रुटी असणारे कोरोना चाचणीचे किट पाठवण्यात आल्याचा मुद्दा बॅनर्जी यांनी मांडला. 

राज्यात कोरोनाच्या चाचण्या अपेक्षित प्रमाणात होत नसल्याच्या चर्चांनी जोर धरला होता, हा मुद्दा अधोरेखित करत बुधवारी बॅनर्जी यांनी एका पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर टीका करत या सर्व चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं. 'हे सारंकाही खोटं आहे. उलटपक्षी बंगालमध्ये त्रुटी असणारे किट पाठवण्यात आले होते. जे आता वापरले जात नाही आहेत. आमच्याकडे गरजेपुरता चाचणीसाठीचे किटही नाहीत', या शब्दांत बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. हा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला. पण, यातच कोलकात्यामध्ये काही नियम बॅनर्जी यांनी शिथिल केले, त्यावरुन राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चाही पाहायला मिळाल्या होत्या.