भारताला लागली लॉटरी! दिवसाला 26 कोटींचा फायदा; गोदावरीच्या पात्रात सापडला 'खजिना'

Krishna Godavari Basin: देशात कच्च्या तेलाच्या नव्या विहिरी सापडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात असलेल्या केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी दिली आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 9, 2024, 08:40 AM IST
भारताला लागली लॉटरी! दिवसाला 26 कोटींचा फायदा; गोदावरीच्या पात्रात सापडला 'खजिना' title=
केंद्रीय मंत्र्यांनीच दिली माहिती (प्रातिनिधिक फोटो)

Krishna Godavari Basin Oil Wells: भारत हा जगातील सर्वाधिक कच्चे तेल वापरणाऱ्या महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे. भारताला जेवढ्या तेलाची गरज आहे त्यापैकी बहुतांश तेल हे परदेशातून आयात केलं जातं. त्यामुळेच भारतात कराची रक्कम वगैरे आकारुन इंधन म्हणजेच पेट्रोल तसेच डिझेल हे इतर देशांच्या तुलनेत फारच महाग मिळतं. परदेशातून तेल आयात करण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये गोदावरी नदीच्या पत्रात तेलाचे मोठे साठे आढळून आले आहेत. गोदावरी नदीच्या पात्रात एकूण 26 तेलाच्या विहिरी आढळून आल्या आहेत. 

केंद्रीय मंत्र्यांनीच दिली माहिती

देशात कच्च्या तेलाच्या नव्या विहिरी सापडल्याची माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी दिली आहे. एकूण 26 विहिरी सापडल्या असून त्यापैकी 4 विहिरींवर कामही सुरु झाल्याचं हरदीप यांनी स्पष्ट केलं. "तेथील 26 विहिरींपैकी 4 विहिरींवर आधीपासूनच काम सुरु आहे. या विहिरींच्या माध्यमातून कमी वेळात आपल्याला फार मोठ्या प्रमाणात गॅस निर्मिती करता येणार आहे. मे, जून महिन्यापर्यंत आपण 45000 बॅरल तेलाचं उत्पादन घेण्यास सक्षम असू अशी अपेक्षा आहे," अस हरदीप सिंग म्हणाले. खरोखरच एवढं उत्पादन घेतल्यास भारतामध्ये उत्पादन घेतल्या जाणाऱ्या तेलापैकी 7 टक्के तेल या साठ्यांमधून येईल तर नैसर्गिक गॅसच्या उत्पादनातही या विहिरींमधून निर्माण केला जाणाऱ्या गॅसचा वाटा हा 7 टक्के इतका असेल.

दिवसाला 26 कोटींचा फायदा

या विहिरींमधून दररोज 45 हजार बॅरल तेलाचं उत्पादन घेता येणार आहे. म्हणजेच आजच्या दरानुसार प्रति बॅरल 70.41 डॉलर इतका दर ग्राह्य धरला तरी या तेल विहिरींमधून दिवसाला 26 कोटी रुपये मुल्य असलेलं तेल उत्पादन घेता येणार आहे. म्हणजेच परदेशातून तेल मागवण्यासाठी वापरलं जाणारं भारताचं 26 कोटी मूल्याचं परदेशी चलन वाचणार आहे.

नेमक्या कुठे सापडल्या या विहिरी?

कृष्णा आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये काकीनाडाच्या किनारपट्टीपासून 30 किलेमीटर आतमध्ये या तेल विहिरी सापडल्या आहेत. 2016-17 मध्ये यावर काम सुरु करण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे या संशोधनाला उशीर झाला.

बंगालच्या खाडीतूनही नवीन उत्पादन सुरु

दरम्यान, दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी असलेल्या ओएनजीसीने बंगालच्या खाडीमधील कृष्णा गोदावरीच्या क्षेत्रातील डीप-वॉटर ब्लॉकमधून तेलाचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. कच्चं तेल आयात करण्यासंदर्भात भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. त्यामुळेच गोदावरच्या पात्रात सापडलेले हे साठे फार महत्त्वाचे ठरणार आहेत.