दुचाकी चालकांसाठी महत्वाची बातमी, केंद्र सरकारकडून दुचाकीच्या नियमात मोठे बदल...

सरकार वेळोवेळी रस्ता सुरक्षेचे नियम बदलत राहते. आता देखील सरकारने काही बदल केले आहेत जे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

Updated: Aug 16, 2021, 06:11 PM IST
दुचाकी चालकांसाठी महत्वाची बातमी, केंद्र सरकारकडून दुचाकीच्या नियमात मोठे बदल... title=

मुंबई : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने दुचाकींच्या डिझाईन आणि मागील बसण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नवीन नियम लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार, दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या लोकांना काही नवीन नियम पाळावे लागतील.

मागील सीटच्या दोन्ही बाजूंना हात पकडण्यासाठी हॅंड होल्डर आवश्यक

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार, आता बाईकच्या मागील सीटच्या दोन्ही बाजूंना हात धरण्यासाठी होल्डर आवश्यक आहे. हे हँड या होल्डरमुळे बाईकच्या मागे बसलेल्या लोकांना सेफटी मिळेल. जेव्हा बाईक चालक अचानक ब्रेक लावतो तेव्हा, हे हॅंड होल्डर खूप उपयुक्त ठरते. 

आतापर्यंत बहुतेक बाईक्समध्ये हे फीचर नव्हते. यासह, दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीसाठी दोन्ही बाजूंनी कव्हर असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जेणेकरून मागील व्यक्तीचे कपडे मागच्या चाकात अडकू नयेत.

बाईकमध्ये हलका कंटेनर लावावा लागेल

बाईकमध्ये आता हलका कंटेनर बसवण्याच्या सूचनाही केंद्राने दिल्या आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिमी आणि उंची 500 मिमी पेक्षा जास्त नसावी. जर हा कंटेनर बाईकच्या मागच्या बाजूला ठेवला असेल, तर फक्त ड्रायव्हरला बाईकवर बसण्याची परवानगी असेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, बाईकच्या मागे दुसऱ्या व्यक्तीला बसता येणार नाही. जर दुसरा व्यक्ती दुचाकीवर बसला असेल, तर ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल.

त्याचवेळी, जर हा कंटेनर मागील प्रवाश्यांच्या बसण्याच्या जागेच्या मागे ठेवला असेल, तर दुसऱ्या व्यक्तीला बसण्याची परवानगी दिली जाईल.

बाईक टायर्स संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

सरकारने टायरसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त 3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम सुचवण्यात आली आहे. या यंत्रणेतील सेन्सरच्या माध्यमातून चालकाला वाहनाच्या टायरमधील हवेच्या दाबाची माहिती मिळते.

तसेच टायर दुरुस्ती किटची शिफारस करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीनंतर टायर संबंधीचे प्रॉबलम्स बाईक चालकाला येणार नाही.

सरकार वेळोवेळी रस्ता सुरक्षेचे नियम बदलत राहते. गेल्या काही वर्षांत रस्ता सुरक्षेचे नियम कडक करण्यावर भर दिला जात आहे.