चीनमधल्या गूढ आजारामुळे केंद्र सरकारने आखला प्लॅन; रुग्णालयाच्या तयारीबाबत दिला महत्त्वाचा सल्ला

Mysterious Virus Infection in China: चीनमधल्या वाढत्या गूढ आजारामुळे भारताच्या आरोग्यमंत्रालयाने खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आकाश नेटके | Updated: Nov 26, 2023, 05:07 PM IST
चीनमधल्या गूढ आजारामुळे केंद्र सरकारने आखला प्लॅन; रुग्णालयाच्या तयारीबाबत दिला महत्त्वाचा सल्ला title=
(Reuters)

Mysterious Virus Infection in China: चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या गूढ आजाराने जगाचं टेंशन वाढवलं आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये न्यूमोनिया सारख्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना भारत सरकारनेही कठोर पावलं उचलली आहेत. केंद्राने आता राज्यांना रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोनानंतर चीनमध्ये सुरू झालेल्या नव्या रहस्यमय आजाराने जगातील अनेक देशांना हैराण करुन सोडलं आहे. या आजाराने लहान मुलांना सर्वाधिक लक्ष्य केलं आहे. चिनी सरकारने अनेक शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अशातच आता भारतातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या आजाराचा सामना करण्यासाठी कोरोना सारख्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही, फक्त नियमांचे पालन करा, असेही त्यात म्हटले आहे. देशात सध्या अलर्टची स्थिती नसल्याचेही सरकारने म्हटले आहे.

चीनमधल्या गूढ आजाराची वाढती प्रकरणे पाहता आरोग्य मंत्रालयाने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना ताबडतोब सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाच्या तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. "सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे लागू करावा. इन्फ्लूएन्झा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, SARS-CoV-2 यासारख्या कारणांमुळे श्वसनाच्या आजारात वाढ होते. आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. यामध्ये घाबरण्याचे कारण नाही," असे मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

लक्षणं कोणती?

चीनमध्ये वेगाने पसरत असलेला हा संसर्ग निमोनियासारखा आहे. मात्र या आजाराची लक्षणं निमोनियासारखी नाहीत. या विषाणूचा संसर्ग झालेल्या मुलांच्या फुफ्फुसांना सूज येते. संसर्ग झाल्यानंतर मुलांना मोठ्या प्रमाणात ताप येतो. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

दरम्यान, बीजिंगसह चीनच्या उत्तरेकडील भागात या आजारामुळए मुले मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा आजार कोरोनाच्या काळाची आठवण करून देत आहे, असे तिथल्या तज्ञांचे म्हणणं आहे. दुसरीकडे चीनमधील अनेक भाग अद्यापही कोरोनापासून पूर्णपणे मुक्त झालेले नाहीत.