COVID DEATH : 30 दिवसांच्या आत नातलगांना मिळणार आर्थिक मदत, सुप्रीम कोर्टाची मान्यता

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे

Updated: Oct 4, 2021, 03:58 PM IST
COVID DEATH : 30 दिवसांच्या आत नातलगांना मिळणार आर्थिक मदत, सुप्रीम कोर्टाची मान्यता  title=

नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू (Covid Death Cases) झाल्यास नातलगांना आर्थिक मदत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आता 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत विविध योजनांअंतर्गत केंद्र आणि राज्यांकडून आधीच दिल्या जाणाऱ्या मदतीव्यतिरिक्त असेल. आरोग्य मंत्रालय आणि एनडीएमए (NDMA) राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील

योजनेचा प्रसार करण्याचे आदेश

भरपाईची रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. भरपाईसाठी अर्ज दाखल केल्याच्या तीस दिवसांच्या आत ही रक्कम कुटुंबातील सदस्यांना द्यावी लागेल. प्रत्येक लाभार्थीची माहिती प्रकाशित करणं आवश्यक असेल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की केवळ मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूच्या कारणाची नोंद न केल्यामुळे, भरपाई नाकारता येत नाही.  आर्थिक साहाय्य देण्याची प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शकरीत्या पार पाडण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा प्राधिकरणांची राहील.

आरटीपीसीआर चाचणीत कोविडची पुष्टी झाल्याच्या तीस दिवसांच्या आत जर रुग्णाचा मृत्यू झाला तर अशा रुग्णाचं कुटुंब भरपाई मिळण्यास पात्र ठरेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. घरी किंवा रुग्णालयात, मृत्यूच्या दोन्ही प्रकरणांमध्ये भरपाई दिली जाईल.