सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रवेश करत ते म्हणाले..... 

Updated: Apr 22, 2019, 08:46 PM IST
सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांचा भाजपमध्ये प्रवेश  title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राजकीय. पटलावर होणाऱ्या हालचालींनीही सध्या चांगलाच जोर धरला आहे. त्यातच आता आणखी एक बातमी समोर येत आहे. नवी दिल्ली येथे सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करत एक नवी जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली आहे. 

'आतापर्यंत मी केसांचा चौकीदार होतो, आज मी देशाचा चौकीदार झालो आहे', असं जावेद हबीब माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये देशात आणलेले बदल मी पाहिले आहेत, त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणं ही माझ्यासाठी आनंदाचीच बाब आहे, असं म्हणत कोणीही आपल्या भूतकाळाविषयी कधीच लाज बाळगू नये ही बाब अधोरेखित केली. 

 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपण गतकाळात एक चहा विक्रेता होतो, हे अभिमानाने सांगत असतील तर, मी एक न्हावी असल्याचा उल्लेख करण्यास लाज का बाळगू', असं हबीब म्हणाले. जवळपास पाचशेहून अधिक हेअर सलुन असणाऱ्या जावेद हबीब यांनी या क्षेत्रात बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. भारतात विविध ठिकाणी त्यांच्या या सलुनच्या शाखा आहेत. ज्यामध्ये तीन आंतरराष्ट्रीय शाखांचाही समावेश आहे.