नवी दिल्ली : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांनी भारतीय सैन्यदलामध्ये अमुलाग्र बदल करून त्याला अत्याधुनिक करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्यातलं एक महत्त्वाचं पाऊल होतं ते थिएटर कमांडचं.
जनरल बिपिन रावत सैन्यदल प्रमुख झाले तेव्हा त्यांचं मुख्य काम होतं ते लष्कर, वायूदल आणि नौदलातील समन्वयाचं. कारगिल युद्धानंतर तीनही दलांमधील समन्वयाची गरज व्यक्त झाली. त्यावेळी आणखी एक सल्ला दिला होता थिएटर कमांडचा.
थिएटर कमांड म्हणजे काय?
थिएटर कमांड म्हणजे तिन्ही सैन्यदलांचे अधिकारी आणि सैनिक एकत्र असलेली कमांड. थिएटर कमांड स्वतंत्रपणे नौदल, वायूदल किंवा लष्कराचीही असू शकते. मात्र या कमांडमध्ये अन्य दलांमधले सैनिक आणि अधिकारी असतात. समन्वयानं कारवाई करण्यासाठी ही थिएटर कमांड उपयोगी ठरते.
देशाच्या सीमांचं संरक्षण
जनरल रावत यांनी 4 थिएटर कमांडवर काम सुरू केलं. देशाच्या चार दिशांना या कमांड तैनात असतील आणि त्यातून देशाच्या सीमांचं संपूर्ण संरक्षण केलं जाईल.
वेस्टर्न थिएटर कमांड ही पाकिस्तान सीमेलगत पंजाब, राजस्थान, गुजरातच्या कच्छ या भागावर लक्ष ठेवेल. सध्या या भागाची देखरेख वेस्टर्न, साऊथ-वेस्टर्न आणि सदर्न कमांड वेगवेगळ्या करतायत.
दुसरी असेल नॉर्दन थिएटर कमांड... जम्मू-काश्मीर, लडाखचा पर्वतमय भागात पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवर ही कमांड लक्ष ठेवेल. सध्या नॉर्दन कमांडकडे ही जबाबदारी आहे.
तिसरी इस्टर्न थिएटर कमांड चीन, बांग्लादेश आणि म्यानमारच्या सीमांवर नजर ठेवेल. सध्या हा भाग लष्कर आणि वायूदलाच्या इस्टर्न कमांडकडे आहे.
सदर्न थिएटर कमांडही तीन्ही दिशांच्या समुद्रकिना-यांच्या सुरक्षेसाठी एक कमांड असेल. सध्या किनारपट्टीचं रक्षण करण्याची जबाबदारी नौदल आणि वायूदलाच्या कमांड स्वतंत्ररित्या करतायत.
सध्या वेगवेगळ्या कमांड
सध्या लष्कराच्या 7, वायूदलाच्या 7 आणि नौदलाच्या 3 अशा 17 वेगवेगळ्या कमांड आहेत. याखेरीज अण्वस्त्रांचं संरक्षण करणारी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आहे. तर अंदमानमध्ये देशातील सध्याची एकमेव थिएटर कमांड आहे. आजमितीस अमेरिकेकडे 11 आणि चीनकडे 5 थिएटर कमांड आहेत.
भारताच्या सीमांवर चीनची वेस्टर्न थिएटर कमांडच लक्ष ठेवते. रशियन सैन्याच्याही 4 थिएटर कमांड आहेत. भारताला या देशांच्या पंगतीत बसवण्यासाठी जनरल रावत यांनी काम आधीच सुरू केलंय. आता त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचं काम असेल हे काम तडीस नेण्याचं.