VIDEO : राज्यसभेत अभुतपूर्व गदारोळ, नेमकं काय घडलं? CCTV फुटेज आलं समोर

मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे

Updated: Aug 12, 2021, 04:16 PM IST
VIDEO : राज्यसभेत अभुतपूर्व गदारोळ, नेमकं काय घडलं? CCTV फुटेज आलं समोर title=

नवी दिल्ली : राज्यसभेत (Parliament Monsoon Session) बुधवारी अभूतपूर्व गदारोळ पाहिला मिळाला. राज्यसभेत (Rajyasabha) सामान्य विमा कंपन्यांचं खासगीकरण करण्यासाठी विमा दुरुस्ती विधेयक मंजूर करताना जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून (Marshal) खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. 

गोंधळाचं सीसीटीव्ही फुटेज हाती

राज्यसभत बुधवारी झालेल्या गोंधळाचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आता बाहेर आलं आहे. विरोधकांनी राज्यसभेतील वेलमध्ये येऊन गोंधळ घातला. मार्शलने खासदारांना रोकण्याचा प्रयत्न करत केला. यावेळी खासदार आणि मार्शलदरम्यान धक्काबुक्की होत असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. राज्यसभेत मार्शल्सना बोलावून विरोधी पक्षाच्या खासदांना मारहाण केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

विरोधी पक्ष आक्रमक, संसद भवनात आंदोलन

राज्यसभेत बुधवारी घडलेल्या या घटनेवरून आता राजकारण तापलं आहे. राज्यसभेतल्या कालच्या गोंधळानंतर आज विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली संसद भवन प्रांगणात महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी आंदोलन केलं. शिवसेना खासदारही (Shivsena MP) या आंदोलनात सहभागी झाले. देशाच्या संसदेत लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप राहुल यांनी केला. देशाचे पंतप्रधान देशाला विकत आहेत, त्यामुळे विरोधकांना संसदेत बोलू दिलं जात नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशातल्या 60 टक्के जनतेचा आवाज दाबला गेल्याचा आरोप त्यांनी केला. 

55 वर्षांच्या संसदीय राजकारणात असे कधी पाहिलेले नाही!

40 ते 50 मार्शल यांना बोलावून खासदारांसोबत गैरवर्तन करण्यात आले आहे, गेल्या 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात असे काही पाहिलेले नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. मी माझ्या 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात हे प्रथमच पाहत आहे. आमच्या पुरुष खासदारांना रोखण्यासाठी महिला मार्शलचा वापर केला जात आहे. तर महिलांना रोखण्यासाठी पुरुष मार्शलचा वापर करुन गैरवर्तन करण्यात आले आहे, असे पवार यांनी म्हटलं आहे.

सरकारकडून विरोधकांवर हल्लाबोल

या सर्व प्रकारानंतर सरकारकडूनही विरोधकांवर हल्लाबोल करण्यात आलाय. विरोधी पक्षांनी संसद कामकाजात विरोधकांनी अडथळा आणला असा आरोप करत संसदेत जे घडलं ते दुर्देवी असल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय. या प्रकरणी विरोधी पक्षांनी माफी मागावी अशीही मागणी ठाकूर यांनी केलीय.
---