बंगळुरू : परिस्थितीवर मात करत फक्त आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त करणारे असंख्य व्यक्तीमत्व आतापर्यंत घडले आहेत. त्यातील एक व्यक्ती म्हणजे मधु एनसी. बीएमटीसीच्या बसमध्ये मधु कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. अशा स्थितीत देखील अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ते प्रचंड मेहनत देखील घेताना दिसत आहे.
बस कंडक्टरची नोकरी सांभाळून तो आपल्या स्वप्नासाठी ५ तास देतो. तो रोज ५ तास युपीएससी परीक्षेची तयारी करतो. त्याने नुकताच युपीएससीची मुख्य परीक्षा पास केली आहे. आता IAS हा टप्पा गाठण्यासाठी त्याचा केवळ एक स्टॉपचा प्रवास बाकी आहे. युपीएससी परीक्षेसाठी २५ मार्च रोजी मधुची मुलाखत चाचणी घेण्यात येणार आहे.
जानेवारी महिन्यात युपीएससी परीक्षेचा निकाल लागला. तेव्हा जाहीर झालेल्या निकालात आपलं नाव पहिल्यानंतर मधुचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुटुंबातील मोठा मुलगा असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे.
ऑक्टोबर महिन्यात २९ वर्षीय मधुने युपीएससीची पूर्व परीक्षा पास केली. त्यानंतर त्याने मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय विषय, मुल्य, भाषा, सामान्य ज्ञान, गणित आणि निबंध लेखन विषयांचा अभ्यास करत आहे. त्याने पूर्व परिक्षा कन्नडमधून तर मुख्य परीक्षा इंग्रजीतून दिली.
मधु कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील मालवली या लहानशा खेड्यात राहतो. त्याने दूरस्थ शिक्षण प्रणालीतून त्याने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मधु हा राज्यशास्त्र विषयाची पदवीधर आहे. मधुच्या घरातून उच्च शिक्षण घेतलेला तो एकटाच आहे.
'माझ्या आई-वडिलांना मी कोणती परीक्षा पास झालोय हे देखील माहित नाही. पण मी कुठलीतरी परीक्षा पास केली आहे. यात त्यांना अत्यंत आनंद आहे.' असं वक्तव्य त्याने सांगताना केलं आहे. सी शिखा बंगळुरू मेट्रोपोलियन ट्रान्सपोर्ट सर्व्हीसचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्या मधुला रोज २ तास मुलाखतीसाठी मार्गदर्शन करतात.