नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर 1 फेब्रुवारीला सादर होणारं Budget 2021 नेहमीपेक्षा वेगळ असणार आहे. यंदा देशाचं बजेट लाल रंगाच्या कपड्यात नव्हे तर ऑनलाईन पद्धतीत सादर होणार आहे. कोरोना संकटानंतर पहिल्यांदा बजेट जाहीर करण्यात येणार असल्यामुळे सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं बजेट 2021कडे लक्ष लागलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार वर्क फॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे बजेट खास असणार असल्याची चर्चा होत आहे. वर्क फॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करात सूट देण्याची घोषणा केली जाऊ शकते.
गेल्या वर्षी कोरोना व्हायरसने फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात थैमान घातलं. आजही हे वादळ शांत झालेलं नाही. दरम्यान कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्यानी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र कर्मचाऱ्यांचा यामध्ये अधिक खर्च देखील झाला. त्यामधे हाई-स्पीड इंटरनेट, पावर बॅकअप, इलेक्ट्रॉनिक एसेसरीज, एयरकंडीशनर आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खिशातून पैसे मोजावे लागले.
एकंदर या सर्व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेत यंदाच्या बजेटमध्ये वर्क फॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करात सूट देण्याची घोषणा केली जाऊ शकते. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय या बजेटमध्ये आणखी काही मोठे बदल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याविषयी सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. शिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीदेखील स्पष्टीकरण दिलेलं नाही. जर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला, तर घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.