मुंबई: प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही बदलेल्या नियमांसंदर्भात नेहमी चर्चा होत असते. मात्र 1 फेब्रुवारीपासून काही नवीन आणि मोठे बदल होत आहेत. या बदलांचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर पडणार आहे. कोरोनानंतर सादर होणारं बजेट, वाढणारी महागाई ते बँकिंग क्षेत्रापर्यंत कोणते 10 मोठे बदल होणार आहेत जाणून घेऊया.
1 फेब्रुवारीला सादर होणार बजेट
नव्या आर्थिक वर्षासाठी सोमवारी अर्थमंत्री निर्मला सितारमण बजेट सादर करणार आहेत. या बजेटमध्ये शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी, कृषी कर्ज आणि अनेक कृषी योजनांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे.
बजेटमध्ये आयात शुल्क, कर वाढवल्यास अनेक गोष्टी महाग होण्याची चिन्हं आहेत. तर ट्रेनची संख्या वाढवण्याबाबत देखील मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिलिंडरचे दर बदलणार
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडर आणि कमर्शियल सिलिंडरच्या किंमती ठरवतात. डिसेंबर 2020 मध्ये 2 वेळा सिलिंडरचे दर वाढले होते. यावर्षी जानेवारीत कंपन्यांनी किंमती वाढवल्या नाहीत. आता फेब्रुवारीमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलसोबत सिलिंडरच्या किंमती वाढवू शकतात.
PNB ग्राहकांसाठी मोठा बदल
1 फेब्रुवारीपासून पीएनबी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल होणार आहे. 1 फेब्रुवारीपासून पीएनबी ग्राहकांना EMV नसलेल्या एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार नाहीत. ATMमधून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
रहदारीसाठी गाड्यांना ई-परमिटची गरज नाहीत
राज्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या मोठ्या गाड्यांना ई-परमिटची गरज लागणार नाही. गाड्यांना SOPच्या मानांकनाचं पालन करावं लागणार आहे.
पूर्ण क्षमतेनं सुरू होणार सिनेमागृह
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सिनेमागृह बंद ठेवण्यात आले होते. आता देशात 100 टक्के क्षमतेनं सिनेमागृह सुरू करण्यात येणार आहे. मार्च महिन्यापासून कोरोनामुळे सिनेमागृह बंद होती.
1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू
सर्व सामान्य लोकांसाठी अखेर पुन्हा एकदा लोकल धावणार आहे. अर्थात त्यासाठी रेल्वेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार नागरिकांना प्रवास करता येणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चपासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद ठेवण्यात आल्या होत्या.
रेशनकार्डवरही मोबाईलनंबर लागणार
1 फेब्रुवारीपासून आता रेशनकार्डवर मोबाईलनंबर लिंक करावा लागणार आहे. त्याशिवाय OTP, IRIS ऑथेन्टिफिकेशन करावं लागणार आहे.
Franklin Templeton सुप्रीम कोर्टाचा निर्णय
Franklin Templeton Mutual Fund च्या बंद असलेल्या स्कीमवर सुप्रोम कोर्टाकडून महत्त्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यांच्या 6 योजनांमधून पैसे काढण्यावर तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती आणली आहे.
स्पाइस जेटची 20 नवीन विमानं सुरू होणार
स्पाइसजेटने 1 फेब्रुवारीपासून 20 नवीन विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने जयपूरला देहरादून, अमृतसर, उदयपूर आणि दिल्लीसह अनेक शहरांना जोडणारी 16 नवीन उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली.