Budget 2019 : ...म्हणून अर्थसंकल्प गुप्त ठेवला जातो

अर्थसंकल्प संसदेत सादर होईपर्यंत तो अतिशय गुप्त का ठेवला जातो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 1, 2019, 08:52 AM IST
Budget 2019 : ...म्हणून अर्थसंकल्प गुप्त ठेवला जातो title=

नवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकार आज आपला अखेरचा अर्थसंकल्प मांडणार आहे. हा अंतरिम अर्थसंकल्पच असणार आहे. वित्त विधेयक न मांडता पुढील महिन्यांसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद संसदेकडून मंजूर करून घेणे एवढेच अधिकार सरकारला आहेत. दरम्यान, गेल्या पाच वर्षात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी सरकारला होती. पण ती त्यांनी गमावली... अशी टीका काँग्रेसने केलीय. त्याला भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अर्थसंकल्पाबद्दल बजेटबद्दल सामान्य माणसापासून ते उच्च पदस्थांनाही उत्सुकता असते. मात्र अर्थसंकल्प संसदेत सादर होईपर्यंत तो अतिशय गुप्त का ठेवला जातो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... 

बजेट गुप्त का ठेवतात?

१९४७ साली ब्रिटनच्या संसदेत 'लेबर चान्सलर' एडवर्ड डोल्टन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी केली होती. मात्र अर्थसंकल्प सादर करण्याच्या आदल्या दिवशी एक पत्रकार त्यांना भेटायला आले. तेव्हा त्यांनी अर्थसंकल्पातील कर प्रस्तावांची माहिती नकळत या पत्रकारासमोर उघड केली... आणि अनपेक्षितपणे सायंकाळच्या वर्तमानपत्रात त्या वर्षाच्या अर्थसंकल्पा संदर्भातल्या बातम्या छापून आल्या...  त्यानंतर एडवर्ड यांना आपली चूक लक्षात आली.... आणि त्यांनी थेट आपला राजीनामाच सोपवला. तेव्हापासून ब्रिटनमध्ये अर्थसंकल्प गुप्त ठेवण्याची प्रथा सुरू झाली आणि भारतानेही हीच प्रथा स्वीकारली.

५ वाजता सादर व्हायचं बजेट

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ ला सादर केला गेला. १९५५-५६ सालापर्यंत अर्थसंकल्प इंग्रजीतून सादर केला जात होता. मात्र बहुसंख्य जनतेला तो समजत नाही असे लक्षात आल्यानंतर तो हिंदीत सादर केला जाऊ लागला. सायंकाळी अर्थसंकल्प मांडण्याची स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष सुरू होती. ही परंपरा १९९९ पर्यंत सुरूच होती. त्यानंतर मात्र एनडीए सरकारच्या काळात माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी २० वर्षांपूर्वी ही परंपरा मोडीत काढली. सिन्हा त्यांनी सायंकाळी ५ वाजता अर्थसंकल्प न मांडता भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता संसदेसमोर मांडला.