Budget 2019 : महिन्याला ५०० रुपयांत शेतकऱ्यांना सन्मान कसा मिळेल, विरोधकांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने चालू कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर केला.

Updated: Feb 1, 2019, 01:40 PM IST
Budget 2019 : महिन्याला ५०० रुपयांत शेतकऱ्यांना सन्मान कसा मिळेल, विरोधकांची टीका title=

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने चालू कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर केला. निवडणुकीच्या तोंडावर अंतरिम म्हणून ओळखला जाणारा हा अर्थसंकल्प असला, तरी त्यातील घोषणा या सामान्यांना दीर्घकालीन उपयोगी ठरणार आहेत. विरोधकांनी मात्र या अंतरिम अर्थसंकल्पावर टीका केली आहे. शेतकऱ्यांना महिन्याला ५०० रुपयांची तोकडी मदत देऊन त्यांना सन्मानाने कसे जगता येईल, असा प्रश्न काँग्रेस नेते शशी थरुर यांनी उपस्थित केला आहे. 

संपूर्ण अर्थसंकल्प अत्यंत निरुपयोगी असल्याचे सांगून शशी थरुर म्हणाले, प्राप्तिकराची मर्यादा पाच लाख रुपयांची करण्यात आली आहे. त्याचबरोबर गरीब शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची थेट मदत दिली जाणार आहे. या गोष्टी सध्या चांगल्या वाटत असल्या, तरी नीट बघितल्यास शेतकऱ्यांना महिन्याला केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. एवढ्या तोकड्या मदतीवर ते सन्मानाने कसे जगू शकतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर ट्विटवर आखरी जुमला बजेट (#AakhriJumlaBudget) हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. अनेक नेटिझन्सनी या हॅशटॅगचा वापर करून केंद्र सरकारला त्यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. त्याचबरोबर अंतरिम अर्थसंकल्पातील विविध तरतुदीवर टीका केली आहे.