Budget 2019: अमित शहांकडून अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक

या अर्थसंकल्पामुळे देशातील शेतकरी, कामगार, मजूर, नोकरदार, लहान उद्योजक, व्यावसायिक या सर्वांचे भले होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Updated: Feb 1, 2019, 03:03 PM IST
Budget 2019: अमित शहांकडून अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक title=

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तोंडभरून कौतुक केले. या अर्थसंकल्पामुळे देशातील शेतकरी, कामगार, मजूर, नोकरदार, लहान उद्योजक, व्यावसायिक या सर्वांचे भले होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने भाजप सरकारने पाऊल टाकले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

पियूष गोयल यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेल्या विविध योजनांचा त्या त्या वर्गाला कसा फायदा होईल, याची माहिती अमित शहा यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली. ते म्हणाले, प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेतून शेतकऱ्यांना थेट उत्पन्न मिळणार आहे. त्याचबरोबर इतर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याला मदत होईल. बॅंकेतून कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनाही सरकारच्या योजनांचा फायदा होईल. देशातील गरीब शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच सरकारने हे निर्णय घेतले आहेत. श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून देशातील १० कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या ६० वर्षांनंतर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे. याचा त्यांना निश्चित उपयोग होईल.

केंद्रामध्ये मत्स्यपालनसंदर्भात नवा विभाग निर्माण केला गेल्यामुळे देशातील मासेमारी करणाऱ्या बांधवांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य मिळेल. त्याचबरोबर एक लाख गावे डिजिटल करण्याच्या संकल्पामुळे तेथील रोजगार वाढेल. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, याकडेही अमित शहा यांनी लक्ष वेधले.