लखनऊ : UP Election 2022 : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच लगबग सुरु आहे. असे असताना माजी मुख्यमंत्री मायावती या सक्रीय राजकारणात दिसून येत नाहीत. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे की, बसपाची मते कोणाला मिळणार. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election) बसपा प्रमुख मायावती (Mayawati) यांची अनुपस्थिती ठळकपणे दिसून येत आहे. बसपाच्या मतांचे (Dalit Vote) काय होणार, कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार, याची उत्सुकता आहे.
त्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरु आहे, मात्र यादरम्यान बसपा प्रमुख मायावती सध्या कुठेच दिसून येत नाहीत. त्यांचा प्रचारावर भर दिसून येत नाही. त्या स्वत: प्रचार करताना दिसत नाहीत. त्या निवडणुकीत आपले आणखी उमेदवार उभे करणार आहेत का, याचीही चर्चा नाही. त्यामुळे बसपाची मते कुठे वळणार, हा सर्वात मोठा प्रश्न समोर येत आहे.
आत्तापर्यंत उत्तर प्रदेशातील बसपाचे मूळ मतदार दलित होते आणि राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की मायावती ग्राऊंड लेवलवरुन गायब झाल्यानंतर दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी इतर पक्ष एकत्र आले आहेत. यूपीच्या मतदारांमध्ये दलितांची संख्या 21टक्क्यांच्या जवळपास आहे.
भाजपचे काही ओबीसी नेते सपामध्ये सहभागी झाल्याने, यादवेतर मागासवर्गीय मतदार समाजवादी पक्षाकडे (SP) जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, केंद्र आणि राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारने सुरु केलेल्या विविध कल्याणकारी योजनांद्वारे भारतीय जनता पक्ष (BJP) मागासलेल्या जातींना आपल्या बाजूने उभे करण्यासाठी मेहनत घेत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, विश्लेषकांचे म्हणणे आहे की मायावती या जाट व्होट बँकेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत, ज्याचा वाटा एकूण दलित लोकसंख्येच्या 55 टक्के आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, दलित हे पूर्वी काँग्रेसचे समर्थक होते, जेव्हा 1990 च्या दशकात बसपा राजकीय शक्ती म्हणून उदयास आली नव्हती.
2007 मध्ये मायावती पहिल्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेवर आल्या तेव्हा पक्षाने बदल करुन सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला लागू केला. तथापि, दलितांवरील मायावतींच्या वर्चस्वाला भाजपने सतत आव्हान दिले आहे आणि अनेक कल्याणकारी योजनांद्वारे जातीय रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election) भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 107 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने 63 आमदारांना पुन्हा संधी दिली आहे, तर 20 आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. त्याचबरोबर 21 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपने सोशल इंजिनिअरिंग डोळ्यासमोर ठेवून तिकीट वाटप केले आहे. भाजपने 68 टक्के जागा ओबीसी, एससी आणि महिलांना दिल्या आहेत. भाजपने ओबीसींना 44, एससींना 19 आणि महिलांना 10 तिकिटे दिली आहेत.
यासोबतच सपा आणि आरएलडीने सोशल इंजिनिअरिंगकडेही लक्ष दिले आहे. एसपी-आरएलडीच्या यादीत जाट आणि मुस्लिमांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. सपाने आतापर्यंत 31 टक्के मुस्लिमांना तिकीट दिले आहे, तर जाट 10 टक्के आणि गुर्जर 7 टक्के उमेदवार आहेत. याशिवाय सपाने 24 टक्के जागांवर दलितांना उभे केले आहे.
मायावतींचा पक्ष बसपा (BSP) ने पहिल्या टप्प्यात 58 पैकी 53 जागांसाठी उमेदवारांची तिकिटे निश्चित केली आहेत. बसपने 14 मुस्लिम आणि 9 अनुसूचित जातीच्या उमेदवारांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसने 40 टक्के महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे.