तरनतारन : पंजाबच्या तरनतारनच्या खेमकरन सेक्टच्या बीओपी अर्थात बॉर्डर आऊट पोस्टमध्ये बीएसएफनं एक पाकिस्तानी ड्रोन पाडलाय. सीमेनजिकच्या भारताच्या हद्दीतील रतोके गावात मंगळवारी रात्री उशिरा एक पाकिस्तानी ड्रोन दिसला होता. त्यावर ताबडतोब कारवाई करत बीएसएफनं एअर स्ट्राईक गननं या ड्रोनला निशाण्यावर घेतलं.
गावातील सरपंच लखबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी स्वत: हा ड्रोन पाहिला होता. रात्री झालेल्या गोळीबारानंतर नजिकच्या गावांत ब्लॅक आऊट करण्यात आला. तसंच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्या. आज सकाळी या सेवा पूर्ववत करण्यात आल्यात.
उल्लेखनीय म्हणजे, भारतीय सीमेत पाकिस्तानातील ड्रोन घुसण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही राजस्थानातही पाकिस्तानी ड्रोन घुसल्याची माहिती मिळाली होती. परंतु, भारतीय जवानांनी या ड्रोनलाही पाडलं होतं. यापूर्वी १० मार्च रोजी राजस्थानच्या सीमेत सुरक्षा दल (बीएसएफ) च्या जवानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी ड्रोनला पाडलं होतं. डिफेन्स राजस्थानचे जन संपर्क अधिकारी (पीआरओ) कर्नल संबित घोष यांनी याबाबत माहिती दिली.