रिकाम्या दुधाच्या पिशव्या आणा आणि पेट्रोल-डिझेलवर सवलत मिळवा; इथल्या पेट्रोल पंपावर मिळतेय ही सुविधा

या पेट्रोल पंपावर तुमच्या घरातील निरुपयोगी गोष्ट दिली तर पेट्रोल-डिझेलवर सवलत मिळणार आहे

Updated: Aug 7, 2022, 06:54 PM IST
रिकाम्या दुधाच्या पिशव्या आणा आणि पेट्रोल-डिझेलवर सवलत मिळवा; इथल्या पेट्रोल पंपावर मिळतेय ही सुविधा title=

देशभरात महागाईसोबत इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे. केंद्रासह काही राज्यसरकाने करांमध्ये कपात केल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण त्यामुळे लोकांचे हवं तसं समाधान न झाल्याने अद्यापही गाडीत पेट्रोल-डिझेल भारताना आपल्या खिशाला कात्री लावावी लागत आहे.

काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणत्या ना कोणत्या प्रसंगामुळे सूट दिल्याच्या बातम्या वाचायला देखील मिळतात. मात्र भारतात एका ठिकाणी पेट्रोल पंपावर तुमच्या घरातील एक निरुपयोगी गोष्ट दिली तर तुम्हाला पेट्रोल-डिझेलच्या दरात सूट मिळू शकणार आहे.

एकदाच वापरेले जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी, राजस्थानच्या भिलवाडा येथील एका पेट्रोल पंप मालकाने दुधाची रिकाम्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या देण्याचे आवाहन केले आहे. त्याबदल्यात या गोष्टी देणाऱ्या लोकांना एक लिटर पेट्रोलवर 1 रुपये आणि एक लिटर डिझेलवर 50 पैशांची सूट मिळत आहे.

भिलवाडाच्या चित्तौडगड रोडवर असलेल्या छगनलाल बगटावर्मल पेट्रोल पंपाचे मालक अशोक कुमार मुंद्रा यांनी ही मोहिम सुरु केली आहे. याद्वारे ते
लोकांना प्लास्टिकचा वापर टाळण्यास प्रोत्साहित करत आहेत.

मुंद्रा यांनी 15 जुलै रोजी तीन महिन्यांची जनजागृती मोहीम सुरू केली होती. या मोहिमेलासरस डेअरी, भिलवाडा जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाठिंबा दिला आहे. पेट्रोप पंपावर जमा झालेल्या रिकाम्या पाकिटांची विल्हेवाट लावण्याचा संकल्प सारस डेअरीने केला आहे. 

भिलवाड्याचे जिल्हाधिकारी आशिष मोदी म्हणाले की, “पेट्रोल पंप मालकांनी प्लास्टिकच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी प्रस्ताव आणला होता. त्यांनी सारस डेअरीच्या रिकाम्या दुधाच्या पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्यांवर सवलत देऊ केली आहे. याबाबत जनजागृती मोहीम सुरू झाली आहे."

मुंद्रा यांनी सांगितले की, "सुमारे 700 दुधाच्या पिशव्या गोळ्या करण्यात आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीने एक लिटरचे रिकामे दुधाचे पॅकेट किंवा दोन अर्धा लिटरची पाकिटे किंवा एक लिटरची पाण्याची बाटली आणली, तर मी त्याला पेट्रोलवर प्रति लिटर 1 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 50 पैसे सवलत देत आहे." ही पाकिटे पेट्रोल पंपावर जमा करून ती विल्हेवाटीसाठी सारस डेअरीला पाठवली जातात.

प्लास्टिकच्या वापराविरोधात जनजागृती करण्यासाठी मी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंद्रा यांना भिलवाडा शहर प्लास्टिकमुक्त म्हणून बघायचे आहे, कारण या गोष्टी केवळ पर्यावरणालाच हानी पोहोचवत आहेत. तसेच भटक्या प्राण्यांना, विशेषत: गायींना धोका निर्माण करतात.

मुंद्रा यांच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांना एका महिन्यात किमान 10,000 रिकामी दुधाची पाकिटे गोळा करण्याची अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही.