विलासरावांवरील आरोपांमुळे रितेशने पीयुष गोयल यांना सुनावले

सात वर्षांपुर्वीच तुम्हाला उत्तर दिले असते, पण... 

Updated: May 14, 2019, 08:46 AM IST
विलासरावांवरील आरोपांमुळे रितेशने पीयुष गोयल यांना सुनावले  title=

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विसालराव देशमुख यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला उत्तर देत अभिनेता रितेश देशमुख याने केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांना सडेतोड उत्तर दिले आहे. विलासरावांनी आपल्या मुलाला चित्रपटांमध्ये भूमिका मिळावी यासाठी २६/११च्या हल्ल्याच्या वेळीही याच गोष्टीला महत्त्वं दिले होते. त्यांच्या याच गंभीर आरोपावर रितेशने थेट जाहीरपणेच त्यांना उत्तर दिले. 

गोयल यांच्या वक्तव्याविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत रितेशने लिहिले, 'हो. हे खरं आहे की मी ताज आणि ओबेरॉय या हॉटेलमध्ये गेलो होतो. पण, तुम्ही आरोप केल्याप्रमाणे हे अजिबातच खरे नाही की गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले होतेवेळी मी त्या ठिकाणी होतो. 

'हो.. हे खरे आहे की मी माझ्या वडिलांसोबत अनेक ठिकाणी गेलो. पण, हे अजिबात खरे नाही की त्यांनी कधीही चित्रपटांत मला भूमिका मिळाव्यात यासाठी कोणाकडे शिफारस केली होती. त्यांनी कधीच कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाशी माझी चित्रपटात निवड करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी संपर्क साधला नाही आणि ते मी गर्वाने सांगतो', असे रितेशने ट्विटमध्ये स्पष्टपणे लिहिले. 

एक मुख्यमंत्री म्हणून अमूक एका व्यक्तीला तुम्ही प्रश्न विचरूच शकता. पण, स्वत:च्या बचावपक्षी उत्तर देण्यासाठी ती व्यक्ती हयातच नसेल तर त्यांच्या अनुपस्थितीत असे आरोप करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हणत रितेशने नाराजी व्यक्त केली. आता थोडा उशिर झाला आहे, सात वर्षांपूर्वी तुम्हाला त्यांनी याचं उत्तर दिले असते असे म्हणत रितेशने गोयल यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सदिच्छा दिल्या. 

काय म्हणाले होते गोयल? 

२६/११ हल्ल्याच्या वेळी सत्तेत असणाऱ्या काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधत महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. 'मी स्वत:सुद्धा मुंबईकर आहे. तुम्हाला २६ / ११चे हल्ले आठवतच असतील.  त्यावेळचे काँग्रेस सरकार इकते कमकुवत होते की ते त्यावेळी काही करुच शकले नाहीत. गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले सुरू असताना त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे ओबेरॉय हॉटेलबाहेर एका चित्रपट निर्मात्याला घेऊन आले होते. आपल्या मुलाला चित्रपटात भूमिका कशी मिळेल याचीच त्यांना जास्त चिंता होती', असं वक्तव्य गोयल यांनी केले होते.