गुरुग्राम : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एकाने शिक्षिकेवर बलात्कार केला. काम देण्याच्या बहाण्याने त्याने तिला भेटायला बोलावले. त्यावेळी त्याने शितपेयातून नशेचा पदार्थ दिला. ती बेशुद्ध पडल्यानंतर त्याने बलात्कार केला. त्यानंतर त्या शिक्षकेचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओच्या माध्यमातून ती व्यक्ती तिला ब्लॅकमेल करुन नेहमी त्रास द्यायची. त्याने आतापर्यंत १४ लाख रुपये उकळले. या जाचाला कंटाळून पीडित शिक्षिकेने पोलिसात तक्रार दाखल केली. ही घटना हरियाणामधील गुरुग्राम शहरात घडली. तक्रार केल्यानंतर ही घटना उजेडात आली.
पीडित महिला शीलता वसाहतीत राहत असून ती एका खासगी शाळेत शिक्षिका होती. पण नोकरी पक्की नसल्याने ती सरकारी नोकरीच्या शोधात होती. त्याच दरम्यान ऑक्टोबर २०१४ साली तिची ओळख फरीदाबादमध्ये राहणाऱ्या मनोज या तरुणाशी झाली. आपल्या अनेक ओळखी असल्याचं सांगत मनोजने एका फॉर्मवर तिची सही घेतली. त्यानंतर तो वरचेवर तिला भेटायला बोलवू लागला.
याच दरम्यान त्याने महिलेला नोकरी संदर्भात मुलाखत असल्याच सांगून एका हॉटेलमध्ये नेले. तिथे त्याने तिला शितपेयातून नशेचा पदार्थ दिला. ती बेशुद्ध होताच त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील फोटो काढून आणि व्हिडिओ बनवून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. त्याने तिच्याकडून १४ लाख रुपये उकळले. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितीने पोलिसांत तक्रार दाखल केली.