काँग्रेसने ४३ हजार किमीचा भारताचा भाग चीनला सरेंडर केला: जे.पी नड्डा

भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Updated: Jun 22, 2020, 03:24 PM IST
काँग्रेसने ४३ हजार किमीचा भारताचा भाग चीनला सरेंडर केला: जे.पी नड्डा title=

नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'काँग्रेसने सैन्याचा अपमान करणे थांबवले पाहिजे आणि राष्ट्रीय ऐक्याचा खरा अर्थ समजून घ्यावा. सर्जिकल आणि एअर स्ट्राईकच्या बाबतीत काँग्रेसने हेच केले होते. सैन्याचा सन्मान करा, अजूनही उशीर झालेला नाही.'

जे.पी नड्डा म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींवर १३० कोटी भारतीयांचा विश्वास आहे. २०१० आणि २०१३ दरम्यान एलएसीमध्ये ६०० वेळा घुसखोरी झाली. काँग्रेस चीनला शरण गेले. ते म्हणाले की, काँग्रेसनं ४३००० किलोमीटरचा भारतीय भाग चीनला सरेंडर केला.'

पुढे ते म्हणाले की, 'माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे विधान केवळ शब्द खेळ आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर कोणत्याही भारतीयांचा विश्वास बसणार नाही. याच काँग्रेसने आपल्या सशस्त्र दलाचे मानसिक खच्चीकरण केले आहे. पंतप्रधान मोदींवर भारताचा पूर्ण विश्वास आहे. १३० कोटी भारतीयांनी कठीण परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पाहिले आहे. त्यांनी देशाला नेहमीच वर ठेवले आहे.

'डॉ. मनमोहन सिंग विविध विषयांवर आपली मतं निश्चितपणे मांडू शकतात. पण पीएमओची जबाबादारी त्यांची नाही. यूपीएच्या सिस्टमचं कार्यालय बंद झालं आहे. जेथे जवानांचा अपमान केला जात होता.'

भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांचे हे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भारत-चीन संघर्षावरील विधानानंतर आले आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारत-चीन संघर्षाबाबत विधान केले. ते म्हणाले की, '१५ आणि १६ जून २०२० रोजी भारताच्या २० शूर सैनिकांनी लडाखच्या गलवान खोऱ्यात सर्वोच्च बलिदान दिले. या शूर सैनिकांनी आपले कर्तव्य धैर्याने पार पाडले आणि देशासाठी आपले प्राण दिले. देशाच्या या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीचे रक्षण केले. या सर्वोच्च बलिदानाबद्दल आम्ही या धैर्यवान सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभारी आहोत. पण त्याचा त्याग व्यर्थ जाऊ नये.'

ते म्हणाले की 'आज आम्ही इतिहासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभे आहोत. आमच्या सरकारचा निर्णय आणि सरकारने घेतलेली पावले आपल्या भावी पिढ्यांचे मूल्यांकन कसे करावे हे ठरवेल. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांच्या खांद्यावर कर्तव्य बजावण्याची जबाबदारी आहे. आपल्या लोकशाहीमध्ये ही जबाबदारी देशाच्या पंतप्रधानांची आहे. देशाच्या सुरक्षा हितसंबंधांवर होणाऱ्या परिणामांविषयी पंतप्रधानांनी त्यांच्या शब्दांबाबत आणि घोषणांबाबत नेहमीच सावधगिरी बाळगली पाहिजे.

ते म्हणाले की, 'एप्रिल 2020 पासून चीनने अनेकदा गलवान खोरे आणि पांगोंग त्सो सरोवरात भारतीय सीमेत जबरदस्तीने घुसखोरी केली आहे. आम्ही त्यांच्या धमक्या आणि दबावापुढे झुकणार नाही. आमच्या क्षेत्रीय अखंडतेशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्याने त्यांच्या षड्यंत्र रचनेला बळी पडू नये. सरकारच्या सर्व भागांनी या धोक्याचा सामना करण्यासाठी कार्य करण्याची आणि परिस्थिती अधिक गंभीर होण्यापासून रोखण्यासाठी एकमेकांच्या सहमतीने काम केले पाहिजे.'