नवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फायदा झाला आहे. अरुणाचल, असम, मणिपूरनंतर आता त्रिपुरामध्ये देखील भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली आहे.
ईशान्येतील ८ पैकी ४ राज्यांमध्ये आता भाजपची सत्ता आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये भाजप युतीचं सरकार बनणार आहे. सिक्किममध्ये देखील भाजप सत्तेत सहभागी आहे. ईशान्यतील फक्त आता मिझोराममध्ये भाजप सत्तेतून बाहेर आहे. यावर्षीच येथे निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपचं पुढचं लक्ष आता मिझोरामवर असणार आहे. कर्नाटकमध्ये देखील त्याआधी निवडणुका होणार आहेत. पण भाजपसाठी येथे मोठं आव्हान असणार आहे.
त्रिपुरामध्ये २५ वर्ष सत्तेत असलेला लाल झेंडा केसरी झेंड्यापुढे पराभूत झाला आणि त्रिपुरात माणिकची जागा हिराने घेतली. ३ मार्च २००८ भाजप आणि मित्रपक्षांसाठी जल्लोषाचा दिवस होता तर विरोधी पक्षांसाठी तो आत्मपरीक्षेचा दिवस होता.
२०१९ लोकसभा निवडणुकीआधी कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरमच्या निवडणुकीवर देखील याचा परिणाम होणार आहे. हा निकाल भाजपसाठी नक्कीच उत्साह भरणारा होता. काँग्रेस पक्षाला मात्र आपले राजकीय डावपेच बदलावे लागणार आहेत. काँग्रेसला नव्याने रणनीती आखण्याची गरज सध्या तरी या निवडणुकांच्या निकालावरुन दिसते आहे.