नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजपच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राज्यातल्या भाजप कोअर कमिटीची आज दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे या बैठकीला असणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा या बैठकीला उपस्थित असणार आहेत. पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याने राज्यातले इच्छुक आज या बैठकीवर लक्ष ठेऊन आहेत. भाजप - शिवसेना युतीची अजून घोषणा झालेली नाही. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र, युतीसाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. मात्र, भाजपने आपल्या उमेदवारांवर आजच शिक्कामोर्तब करणार आहेत. ज्या भाजपच्या विद्यमान जागा आहेत, त्यावरच चर्चा होऊन उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपच्या सर्व उमेदवारांचे नावे आजच निश्चित केली जाणार आहेत. ११९ जागा शिवसेनेला देण्यासाठी भाजप तयार आहे. त्यापेक्षा जास्त जागा देण्याला अमित शाह यांचा विरोध आहे. १२३ जागांची शिवसेनेची मागणी आहे. त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरु आहे.
विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असूनही शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. सुरुवातीला निम्म्या जागांसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेने भाजपच्या ठाम पवित्र्यानंतर नमती भूमिका घेतली होती. मात्र, तरीही दोन्ही पक्षांमध्ये आणखी पाच जागांवरून चढाओढ सुरु आहे. कोणताही पक्ष या जागा सोडायला तयार नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, युतीमधील ११ पैकी सहा जागांचा प्रश्न नुकताच सुटला. मात्र, अद्यापही पाच जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झालेले नाही. त्यामुळे आता या जागांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समोरासमोर बसून चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. या पाच जागांमध्ये औसा (लातूर), वडाळा (मुंबई), ऐरोली (ठाणे), बेलापूर (ठाणे), उल्हासनगर (ठाणे) या मतदारसंघाचा समावेश आहे.