Himachal Pradesh Election 2022 : हिमाचलप्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी आज मतमोजणी पार पडतेय. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) जोरदार चुरस रंगली आहे. क्षणा क्षणाला निकाल बदलत असल्याने कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता मतदारांबरोबर संपूर्ण देशाला लागली आहे. हिमाचलमध्ये भाजपचे प्रभारी विनोद तावडे (Vinod Tawde) शिमल्यात (Shimala) दाखल झाले असून निकालांचा कल पाहता त्यांनी तातडीने मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची भेट घेतली असून दोघांमध्ये बैठक सुरु आहे.
काँग्रेसची जोरदार टक्कर
हिमाचलमध्ये काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. तर आपला इथे खातंही उघडता आलेलं नाही. 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपने 44 जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 21 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण यावेळी चित्र काहीसं बदलताना दिसत आहे. भाजपच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. कांग्रेसने 33 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला 31 जागांवर आघाडी आहे. त्यामुळे इथे काँटे की टक्कर सुरु आहे. बहुमतासाठी 35 जागांची गरज आहे.
कोणत्या मुद्द्यावर मतदान
निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिमाचल प्रदेशमधल्या 12 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये जनसभा घेतल्या होत्या. तर गृहमंत्री अमित शहा यांनीही हिमाचलमध्ये प्रचार केला होता. त्यामुळे भाजप सत्तेची पुनरावृत्ती करणार असं बोललं जात होतं. पण सध्याचे निकाल पहाता भाजपासाठी पुन्हा सत्ता स्थापन करणं तितकंच सोप नाही. काँग्रेसने स्थानिक मुद्ये पुढे करत रणनिती आखली होती. वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर काँग्रेस पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहे.