या पेक्षा वाईट काय असू शकतं! मुलाचा मृतदेह देण्यासाठी मागितली लाच, आई-वडिलांवर भीक मागण्याची वेळ

भ्रष्टाचाराचा कळस, पोटच्या मुलाचा मृतदेह मिळवण्यासाठी वृद्ध आई-बापाची वणवण

Updated: Jun 9, 2022, 09:01 PM IST
या पेक्षा वाईट काय असू शकतं! मुलाचा मृतदेह देण्यासाठी मागितली लाच, आई-वडिलांवर भीक मागण्याची वेळ title=

बिहार : माणूसकीला काळीमा फासणारी एक घटना नितीश कुमार यांच्या बिहारमध्ये समोर आली आहे. ही घटना ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. सरकारी रुग्णालयातून आपल्या  मुलाचा मृतदेह मिळवण्यासाठी एका आई-बापाला चक्क भीक मागावी लागली. या घटनेने सामान्य माणसाच्या काळजाला पाझर फुटेल, पण सरकारी रुग्णालयातील निगरगट्ट माणसांना याची जराही लाज वाटली नाही.

बिहारच्या समस्तीपूरच्या रस्त्यावर एक वृद्ध जोडपं भीक मागत फिरत होतं. कारण होतं सरकारी रुग्णालयात देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. काही दिवसांपूर्वी महेश ठाकूर या व्यक्तीचा मुलगा बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी याबाबत पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. 7 जून रोजी महेश ठाकूर यांना पोलिसांनी त्यांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली. 

महेश ठाकूर मुलाचा मृतदेह घेण्यासाठी सरकारी रुग्णालयात पोहचले, पण त्यांच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली. शवविच्छेदन करणाऱ्यांनी महेश ठाकूर यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली त्याशिवाय मृतदेह देणार नाही असं त्यांना सांगितलं. 

महेश ठाकूर यांच्याकडे इतके पैसे नव्हते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पैसे गोळा करण्यासाठी त्यांना भीक मागावी लागली. लोकांना जेव्हा भीक मागण्याचं कारण कळलं तेव्हा अनेकांनी संताप व्यक्त केला. 

ही घटना समोर आल्यानंतर दरवेळेप्रमाणे रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचं सरकारी उत्तर दिलं.