"...म्हणून पूल पाडला"; बिहार दुर्घटनेप्रकरणी नितीश कुमार सरकारचा मोठा दावा

Bhagalpur Bridge : बिहारमधील भागलपूरमध्ये एक बांधकाम सुरू असलेला पूल नदीत कोसळला. अगुवानी-सुलतानपूर पूल उद्घाटनापूर्वीच गंगा नदीत बुडाला आहे. या पुलाची किंमत सुमारे 1750 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. या पुलाचा काही भाग पडण्याची ही पहिलीच वेळ नाही.

आकाश नेटके | Updated: Jun 5, 2023, 10:31 AM IST
"...म्हणून पूल पाडला"; बिहार दुर्घटनेप्रकरणी नितीश कुमार सरकारचा मोठा दावा title=

Bhagalpur Bridge : बिहारमधील (Bihar) भागलपूरमध्ये एक बांधकाम सुरू असलेला पूल (Bridge) कोसळला आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून त्यात काही सेकंदात पूल नदीत बुडाला. याआधीही हा पूल तुटला होता. त्यामुळे तो पुन्हा बांधला जात होता. मात्र आता पुन्हा एकदा तोच पूल पूर्णपणे तुटून नदीत बुडाला आहे. 1750 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चार वर्षांपूर्वी या पुलाची पायाभरणी मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये आधी पुलाचा काही भाग तुटतो आणि नंतर काही वेळातच संपूर्ण पूल नदीत बुडतो. घटनास्थळी उपस्थित अनेकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या फोनमध्ये कैद केला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे. 

1750 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या पुलाच्या उद्घाटनासाठी आतापर्यंत 8 डेडलाईन देण्यात आल्या होत्या. या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी हरियाणाच्या एसपी सिंगला कन्स्ट्रक्शनला देण्यात आली होती.  2013 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याची पायाभरणी केली होती. त्याचे बांधकाम 2015 मध्ये सुरू झाले. 2019 मध्ये पूल सुरू करण्याची पहिली डेडलाइन होती परंतु आतापर्यंत 8 डेडलाइन अयशस्वी झाल्या आहेत. यंदा या वर्षीच पूल सुरू होणार होता मात्र त्यापूर्वीच पूल कोसळला. त्यामुळे 1750 कोटी रुपये पाण्यात गेले असे म्हटलं जात आहे.

या धक्कादायक घटनेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपने नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे. हा पूल गंगा नदीवर बांधला जात होता. भागलपूरला खगरिया जिल्ह्याला जोडणारा अगुवानी-सुलतानगंज पूल कोसळून झालेल्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि रस्ते बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी घाईघाईत पत्रकार परिषद घेत पुलामध्ये त्रुटी होत्या, त्यामुळेच तो पाडण्यात आल्याचे सांगितले.

गेल्या वर्षी 30 एप्रिललाही या पुलाचा काही भाग कोसळला होता. आम्ही या घटनेचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी-रुरकीशी संपर्क साधला आहे. त्यांचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. मात्र ज्या तज्ञांनी पुलाच्या संरचनेचा अभ्यास केला आहे त्यांनी आम्हाला सांगितले की यामध्ये गंभीर त्रुटी आहेत. गेल्या वर्षी वादळात या पुलाचा काही भाग कोसळला होता. त्यावेळी ही घटना खूप चर्चेत होती. तत्कालीन विरोधी पक्षनेता या नात्याने मी यावर प्रश्न उपस्थित केला होता. सत्तेत आल्यावर आम्ही चौकशीचे आदेश दिले आणि तज्ज्ञांचे मत मागवले होते, असे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले. तसेच आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही, त्यामुळे पुलाचा काही भाग पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.  रविवारी पुलाचा काही भाग पाडणे हा या कवायतीचा एक भाग होता, असे प्रत्यय अमृत यांनी सांगितले.

प्रत्यय अमृत पुढे म्हणाले की, "अंतिम अहवाल आल्यानंतर राज्य सरकार या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकेल. यासोबतच एफआयआर नोंदवण्याची कारवाईही केली जाणार आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना फोन करून अपघाताचा सविस्तर अहवाल मागवला. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 1,700 कोटी रुपये आहे."