उत्तर प्रदेश-बिहारसह सहा राज्यांना मिळाले नवे राज्यपाल

नव्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ANI | Updated: Jul 20, 2019, 02:36 PM IST
उत्तर प्रदेश-बिहारसह सहा राज्यांना मिळाले नवे राज्यपाल title=

नवी दिल्ली : नव्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील भाजपचे ज्येष्ठ  नेते राम नाईक यांना उत्तर प्रदेशच्या राज्यपाल पदावरून हटविण्यात आले आहे. नव्या बदलात राम नाईक यांना स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावर उत्तर प्रदेशच्या  राज्यपालांची जबाबदारी असेल. याआधी आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती. 

सहा राज्यांच्या नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रपती भवनातून आज देण्यात आली. काही राज्यांतील राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या असून मध्य प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांना मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. 

 उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी, त्रिपुराचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी आणि नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होत आहे. या चारही राज्यांत नव्याने नियुक्त्या करण्यात आल्यात. बिहार आणि मध्य प्रदेशमधील विद्यमान राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

 

राज्य सध्याचे राज्यपाल नवे राज्यपाल
उत्तर प्रदेश राम नाईक (कार्यकाळ पूर्ण) आनंदीबेन पटेल
पश्चिम बंगाल केसरीनाथ त्रिपाठी (कार्यकाळ पूर्ण) जगदीप धनखर
मध्य प्रदेश आनंदीबेन पटेल (बदली) लालजी टंडन
बिहार लालजी टंडन (बदली) फगु चौहान
त्रिपुरा कप्तान सिंह सोलंकी (कार्यकाळ पूर्ण) रमेश बैंस
नागालँड पद्मनाभ आचार्य (कार्यकाळ पूर्ण) आरएन रवी