कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग, राज्यपाल थोडक्यात बचावले

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय

Updated: Feb 13, 2019, 10:26 AM IST
कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग, राज्यपाल थोडक्यात बचावले  title=

प्रयागराज : उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आगीची घटना घडलीय. या आगीतून बिहारचे राज्यपाल लालजी टंडन थोडक्यात बचावलेत. मंगळवारी लालजी टंडन आपल्या तंबूत निवांतपणे झोपलेले असताना अचानक तंबूला आग लागली... आणि म्हणता म्हणता तंबूतील सगळ्याच वस्तूंनी पेट घेतला. लालजी टंडन या आगीतून सहीसलामत बाहेर पडले. परंतु, त्यांचा मोबाईल, चष्मा आणि इतर सामान मात्र जळून खाक झालंय. 

रात्री जवळपास २.३० वाजल्याच्या सुमारास सर्वत्र शांतता असताना ही घटना घडली. या घटनेमध्ये परिसरातील तीन तंबू जळाले. सेक्टर १८ एरैल प्रशासकीय कॅम्पमध्ये ही आग लागली होती. 

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. या घटनेनंतर लालजी टंडन यांना सुरक्षितरित्या सर्किट हाऊसला हलवण्यात आलं. यंदाच्या कुंभमेळ्यात तंबूला आग लागण्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वी गोरखनाथ संप्रदायच्या शिबिरातही लागलेल्या आगीत दोन तंबू जळाले होते.

त्यापूर्वी १९ जानेवारी रोजी कुंभच्या सेक्टर १३ मध्ये आगीची घटना घडली होती. यामध्येही काही तंबू जळून खाक झाले होते. 

तर त्याआधी कुंभ सुरू होण्याच्या आदल्याच दिवशी आगीची घटना घडली होती. कुंभ मेळा १५ जानेवारीपासून सुरू होणार होता परंतु, १४ जानेवारी रोजी दिगंबर आखाड्यातील तंबूला आग लागली होती.