Crime News : बिहारमध्ये (Bihar Crime) हनी ट्रॅपचे (Honey Trap) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बिहारच्या गया जिल्ह्यामध्ये एका विद्यार्थ्याचे अपहरण करुन खंडणी मागण्यात आली आहे. पोलिसांच्या (Bihar Police) विशेष पथकाने अपहरण झालेल्या मुलाची सुटका करुन चार आरोपींना या प्रकरणात अटक केली आहे. हनी ट्रॅपद्वारे अपहरण केल्यानंतर आरोपींनी 50 लाखांची खंडणी मागितली होती. त्यानंतर गया पोलिसांनी पाटणा पोलीस आणि एसटीएफच्या मदतीने मुलाला सोडवलं आहे. आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
इंजेक्शन देऊन करायचे बेशुद्ध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गया येथील बेलागंज येथे राहणारा ऋषभ कुमार (20) याची इंस्टाग्रामवर प्रिया नावाच्या तरुणीशी मैत्री झाली. दोघांमध्ये बोलणं वाढलं आणि ते एकमेकांच्या जवळ आले. मुलीने त्याला भेटायला पाटण्याला बोलावलं होतं. त्यानंतर ऋषभ प्रियाला भेटायला पाटण्याला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा प्रियाने ऋषभला पाटण्याला बोलवलं. प्रियाने यावेळी त्याला निर्जन स्थळी भेटण्यासाठी बोलावले होता. मात्र जेव्हा तिला भेटायला गेला तेव्हा त्याचं अपहरण करण्यात आले. त्यानंतर ऋषभला हातपाय बांधून एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आले होते. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करू नये म्हणून आरोपी त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करायचे.
ऋषभच्या तपासासाठी पोलिसांनी स्थापन केली एसआयटी
ऋषभ 30 जून रोजी पाटण्याला जात असल्याचे सांगून घरून निघाला होता, मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यानंतर 1 जुलै रोजी ऋषभच्या फोनवरूनच त्याच्या घरी फोन आला आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. पैसे मिळाले नाही तर ऋषभला जीवे मारण्याचा इशाराही अपहरणकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर ऋषभच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ विशेष पथक स्थापन करून तपास सुरू केला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ऋषभ एका मुलीला भेटल्याचे समोर आले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. चौकशीमध्ये मुलीने कबुल केले की आपण सहकाऱ्यांसह ऋषभला हनीट्रॅप केले होते. त्यानंतर तो पाटण्याला आल्यानंतर त्याचे अपहरण केले. त्यानंतर मुलीने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता एका फ्लॅटमध्ये ऋषभ सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याची तिथून सुटका केली. अपहरण झाल्यानंतर तीन दिवस ऋषभवर अत्याचार झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
कसं अडकवलं जाळ्यात?
ऋषभने सांगितले की, 30 जून रोजी तो प्रियाला भेटण्यासाठी त्याच्या तीन मित्रांसह संपतचक येथे गेला होता. यानंतर प्रियाने त्याला सांगितले की तिला त्याच्यासोबत एकांतात वेळ घालवायचा आहे. म्हणून तू तुझ्या मित्रांना जायला सांग. यानंतर प्रिया त्याला एका निर्जनस्थळी घेऊन गेली. मात्र तिथे आधीच तिघे आरोपी मास्क घालून आले होते. काही कळायच्या आत त्यांनी मला पकडून इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. यानंतर माझे डोळे उघडले तेव्हा माझे हात पाय बांधलेले होते, असे ऋषभने सांगितलं.
दरम्यान, या मागचा खरा सुत्रधार प्रीतम कुमार नावाचा जिम ट्रेनर असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रीतमने शुभम आणि रोशन या दोन मित्रांना सोबत घेऊन प्रियासोबत मैत्री केली. त्यानंतर हे तिघेही प्रियाच्या मदतीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मुलांना जाळ्यात अडकावयचे. मात्र ऋषभला हनी ट्रॅप केल्यानतंर त्यांचा हा डाव फसला. पोलिसांनी प्रीतम आणि त्याच्या मित्रांना अटक करुन मुलीला सुधारगृहात पाठवले आहे.