शिलाँग : Congress in Meghalaya : देशातील भाजपसमोर स्वतःला सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने ( TMC) काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. TMC ने मेघालयमध्ये ( Meghalaya) माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह 12 आमदारांचा पक्षात समावेश केला आहे. राज्यात काँग्रेसचे (Congress) 18 आमदार होते, त्यापैकी आता केवळ 6 आमदार काँग्रेसचे राहिले आहेत. (Big blow to Congress in Meghalaya, 12 out of 18 MLAs join TMC)
मेघालयात अचानक घडलेल्या या घटनेनंतर आता TMC निवडणूक न लढवता तिथला सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्ष बदलण्यासाठी दोन तृतियांश संख्याबळाची पूर्तता करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या मुकुल संगमा यांच्यासह आमदारांच्या आमदारकीला कोणताही धोका नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा हे गेल्या अनेक दिवसांपासून पार्टी हायकमांडवर नाराज होते. हायकमांडने त्यांच्याशी चर्चा न करता व्हिन्सेंट एच. पाला यांना मेघालय प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवे प्रमुख बनवल्याने त्यांची नाराजी होती. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ऑक्टोबरमध्ये मुकुल आणि व्हिन्सेंट एच पाला यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता हा वाद मिटला असल्याचे मानले जात होते, मात्र महिनाभरानंतर मुकुलसह 12 आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
TMC सध्या देशभरात पक्षाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुइझन फ्ल्युरिओ यांचा पक्षात समावेश केला आहे. त्याचवेळी हरियाणातील काँग्रेस नेते अशोक तन्वर, भाजपचे बंडखोर नेते कीर्ती आझाद यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आसाम आणि त्रिपुरामध्येही टीएमसीचा झपाट्याने विस्तार झाला आहे.
पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून असल्याचे मानले जात आहे. पक्ष विस्ताराच्या माध्यमातून ममता बॅनर्जी 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसऐवजी भाजपची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी म्हणून स्वत:ला सिद्ध करू इच्छित आहे. त्यामुळे विविध राज्यांतील बड्या नेत्यांना सोबत घेण्यात सपाटा तृणमूल काँग्रेसकडून होत आहे.